परजिल्ह्यातील कष्टकऱ्यांना मदतीचा हात, संभाजीनगरातील सामाजिक संघटनांचा पुढाकार

कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लोकांनी घरी राहावे असे सांगतानाच अत्यावश्यक नसलेले सगळे उद्योग तात्पुरते बंद करण्यात आले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. या लॉकडाऊनमुळे विविध कंपन्यांमध्ये काम करणारे अस्थायी कर्मचारी, विद्यार्थी यांची गैरसोय निर्माण झाली होती. ही गैरसोय दूर करण्यासाठी संभाजीनगरातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

संभाजीनगरातील जयभवानी नगर येथील मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हिम्मत पटेल, गायत्री पटेल व मनपाच्या चिकलठाणा येथील शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र सोळंके यांनी पुढाकार घेत धूत मोटार्समध्ये अस्थायी स्वरूपाचे काम करणाऱ्या नागपूर, गोंदिया, यवतमाळ, भंडारा येथील तरुण तरुणींच्या जेवणाची व्यवस्था केली. तसेच या तरुण-तरुणींना पुंडलिकनगर पोलिसांच्या मदतीने आपापल्या गावी पोहोचण्यासही मदत केली.

मातोश्री प्रतिष्ठानने गोरगरीब, मेस बंद झाल्यामुळे अडचणीत सापडलेले विद्यार्थी, तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. पुंडलिकनगर पोलीस ठाणे आणि आसपासच्या परिसरात जेवण उपलब्ध करून दिले जात असताना पोलीस ठाण्यात काही परगावचे तरुण आपली समस्या घेऊन आलेले होते. धूत मोटार्समधील परगावच्या अडचणीत आलेल्या या अस्थायी कामगार कर्मचाऱ्यांची माहिती हिम्मत पटेल यांनी घेतली. ही अडचण सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि पोलीस निरिक्षक सोनवणे यांच्या मदतीने मातोश्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांच्यासाठी आर्थिक मदत उभी केली. या तरुणांसाठी गाडीची आणि जेवणाची सोय उपल ब्ध करून दिली आणि ते सुखरूप आपल्या गावापर्यंत पोहोचतील याची खात्री केली. यावेळी परमेश्वर हेडगे, मनिष वंजारे, सचिन पटेल, हनुमान कौचट, कर्नल अमोल वंजारे, बबलूभाई, योगेश जाधव, लक्ष्मण थेटे, श्याम क्षीरसागर, नितीन ढेंबरे, संदिप शिंदे यांनीही मदत केली.

आपली प्रतिक्रिया द्या