
कोरोनापासून बचावासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एक उत्तम उपाय आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील नागरिक त्यासाठी प्रयत्नही करत आहेत. पण नेमक्या कोणत्या पदार्थांचे सेवन करून आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो याची माहिती सर्वांनाच नाही. ‘आयुष’ मंत्रालयाने ती दिली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती शेअर केली आहे. ‘आयुष’ हे केंद्रीय मंत्रालय असून देशभरातील आयुर्वेदिक संस्थांवर त्याचे नियंत्रण आहे. ‘आयुष’ने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या संकेतस्थळावर छायाचित्रांसह पुढीलप्रमाणे उपाय सांगितले आहेत.
- गरम पाणी प्या. त्यामुळे शरीरातील विषारी तत्वे बाहेर फेकली जातात.
- रोज योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा करणे आरोग्यास फायदेशीर आहे.
- रोजच्या जेवणात हळद, जीरे, लसूण, कोथिंबिर यांचा वापर करावा.
- रोज सकाळी 10 ग्रॅम च्यवनप्राश खाल्ल्यानेही कोरोनाशी लढण्यास मदत होईल.
- तुळस, दालचिनी, काळी मिरी, मनुका आणि सुंठ यांचा काढा बनवून दिवसातून दोन वेळा प्यावा.
- त्यामध्ये गूळ किंवा लिंबूचाही वापर करता येऊ शकतो.
- अर्धा चमचा हळद घातलेले एक ग्लास गरम दूध दिवसातून एक किंवा दोन वेळा प्यावे.
- घसा खवखवत असेल तर गरम पाण्यात पुदिन्याची पाने किंवा जीरे पावडर घालून वाफ घ्यावी.
- लवंग पावडर मधामध्ये मिसळून त्याचे चाटण घ्यावे.
- सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही नाकपुडयांमध्ये खोबरेल तेल किंवा तूप लावावे.
- दिवसातून एक-दोन वेळा एक चमचा खोबरेल तेल तोंडात घ्यावे आणि दोन-तीन मिनिटे जीभेने तोंडामध्ये पसरवावे. त्यानंतर ते न गिळता गरम पाण्याने गुळण्या करून चूळ भरावी.




























































