कोल्हापुरात दुर्गम भागातील तरुणाला कोरोनाची लागण

445

कोल्हापूर जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या दोन करोनाबाधितांचे दोन चाचणी अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनाला एका बाजूला हायसे वाटत असतानाच दुसऱ्या बाजूला शाहुवाडी सारख्या दुर्गम तालुक्यातील एका छोट्या गावातील तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं कळालं आहे. गुरुवारी सकाळी त्याला कोरोना आजाराने ग्रासल्याचे निदान करण्यात आले. हा तरुण दिल्लीतील निजामुद्दीन भागात आयोजित करण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला गेला होता. तिथून गावाला परतल्यानंतर तो आसपासच्या दहा-बारा गावात तो वावरला होता. त्यामुळे त्याच्या गावासह तो ज्या गावांमध्ये गेला होता त्या गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा तरुण कोणाकोणाच्या संपर्कात आला होता त्याची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरु असून तरुणाच्या कुटुंबियांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हा तरूण गेल्या महिन्यात दि.17 मार्च रोजी दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमासाठी गेला होता.

कोल्हापूर जिल्ह्यातील 36 जणांचे नमुने पुण्यातील एन.आय.व्ही.ला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. 36 पैकी 34 जणांचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधीत कुटुंबाशी संपर्कात असलेल्या महिलेचाही समावेश आहे. ही महिला तसेच पुण्याहुन आलेल्या एक कोरोनाग्रस्त असे दोघांचे दुस-यांदा नमुने तपासल्यानंतर दोघांचेही अहवाल निगेटीव्ह असल्याचे कळवण्यात आले आहे. पुण्याहून आलेल्या तरुणाची बहीण आणि कोल्हापुरातील एक महिला असे मिळून फक्त दोघेच जण सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधित उरले असल्याचं कळालं होतं.मात्र दुर्गम भागातील तरुणालाही कोरोनाची लागण झाल्याने ही संख्या आता 3 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या