कोरोनाच्या वक्रदृष्टीमुळे पौरोहित्य करणाऱ्यांचे ‘आर्थिक’ ग्रहमान बिघडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
photo courtsey- myindiamyglory.com

सुनील उंबरे, पंढरपूर

गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. गर्दी टाळण्यासाठी नित्योपचार वगळता देवीदेवतांची मंदिरे आणि इतर धार्मिक विधी बंद करण्यात आले आहेत. परिणामी मंदिरातील भक्तांसाठी होणारी पूजाअर्चा आणि घरोघरी चालणारे धार्मिक विधीत खंड पडला आहे. त्यामुळे पौरोहित्य करणाऱ्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे आणि त्याला अटकाव करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पौरोहित्य करणाऱ्या अनेक गुरुजींच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे मंदिरांना टाळे ठोकण्यात आली आहेत. जमावबंदी आदेश असल्याने कोणी भाविक मंदिराकडे फिरकत नाहीत. मंदिरातील भक्तांसाठी होणाऱ्या पूजाअर्चा, धार्मिक विधी पुर्णतः बंद आहेत. भाविकांचा संपर्क तुटल्याने दक्षिणेचेा मार्ग बंद झाला आहे. पूजापाठ आणि धार्मिक विधी करुन आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणारी हजारो कुटूंब कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक संकटात सापडली आहेत. या संकटकाळात पुरोहितांना आर्थिक हातभार लावण्यासाठी सरकारची कोणतीही योजना नाही. कर्ज काढून या कुटुंबांना संसाराचा गाडा चालवावा लागत आहे. भविष्यात पौरोहित्य करणारे कर्जबाजारी होण्याचा धोका आहे. घरातील आजारपण, लहान मुलांचा सांभाळ, इतर प्रापंचिक अडचणी त्यात राज्य सरकारच्या धान्यवाटप यादीत पुरोहिताचा समावेश नसल्याने अडचणीत अधिकच भर पडली आहे. पुरोहितांची शास्त्रीय कारणे व स्वाभिमान यामुळे कोणाकडे हात पसरणे उचित नसल्याने शासनाने तातडीने लक्ष घालून या आर्थिक अडचणीतून या मंडळींना बाहेर काढण्याची मागणी राजन हिवरकर गुरुजी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.