लॉकडाऊन काळात प्रवासासाठी एसटीची नियमावली, एसटीच्या विभागीय पातळीवर नियंत्रण कक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
st bus
फाईल फोटो

लॉकडाऊन काळात राज्यातील विविध शहरात अडकून पडलेल्यांसाठी एसटी महामंडळाकडून बससेवा सुरू करण्यात आली आहे. या प्रवाशांसाठी महामंडळाने एक नियमावली ठरवली असून एसटीच्या प्रत्येक विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा, अशा सूचना एसटी महामंडळाने सर्व विभागीय कार्यालयांना दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. यामुळे मागील एक महिन्यापासून नागरिक विविध शहरात अडकून पडले आहेत. या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्याची मुभा आता राज्य सरकारने दिली आहे. परराज्यातील नागरिकांसाठी रेलवेद्वारे वाहतूक केली जात आहे. तर, राज्यातील वाहतुकीची व्यवस्था राज्य परिवहन महामडळातर्फे (एसटी) केली जाणार आहे. त्यासाठी एसटीच्या दहा हजार बसचा ताफा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एसटीकडून अडकलेल्या नागरिकांना मूळ गावी सोडण्यास सुरूवात झाली असून, गुरुवारी स्वारगेट येथून विद्यार्थ्यांना घेऊन पहिली बस रवाना झाली. यानंतर रात्री उशीरा गुजरात राज्यातील भावनगर येथील नागरिकांनां घेउन एक एसटी बस रवाना झाली.

लाॅकडाऊन काळात नागरिकांना एसटीने जावयाचे झाल्यास, त्यांना प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन करावे लागणार आहे. प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकाला सरकारने संबंधितांच्या प्रवासास अनुमती दिल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच वैदयकिय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक करण्यात आले असून नागरिकांना बसच्या प्रवासमार्गाचे सुरवातीचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण अशाच प्रवासास परवानगी दिली जाणार आहे. त्यांना मार्गातील मधल्या थांब्यावर उतरता येणार नाही. या सर्वाच्या नियोजनासाठी एसटीच्या विभागीय पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) राहूल तोरो यांनी सर्व विभागीय कार्यालयांना दिल्या आहेत.

बसेसचे निर्जंतुकीकरण आवश्यक
प्रशासनाने परवानगी दिलेल्या व्यक्तीला एसटीमधून प्रवास करता येणार आहे. संबंधित प्रवाशांना बसमध्ये बसण्यापूर्वी सॅनीटायझरने हात निर्जंतुक करावे लागणार आहेत. याशिवाय प्रवासाआधी आणि नंतर बसचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे, असेही सांगण्यात आले आहे.