
पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळीच ‘लॉक डाऊन’चा निर्णय घेतल्यामुळे आपल्या देशात व महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या घटली. मनुष्यहानी नियंत्रणात आली, नाहीतर आपल्याही देशात चीन, अमेरिका, इटली इत्यादी देशांप्रमाणे हाहाःकार माजला असता, असे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील प्रसिद्ध जनरल फिजिशियन डॉ. मंगेश तिवसकर यांनी दै. ‘सामना’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कोरोनाचा प्रसार वाढू लागताच प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ‘लॉक डाऊन’ सुरू केले. रेल्वे, बस सार्वजनिक व खासगी वाहनांवरही बंदी आणली. 8 दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऱया देशात ‘लॉक डाऊन’ घोषित केले. त्यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार झाला नाही. काही कोरोना संशयिताना होम क्वारन्टाईन करण्यात आले, तर काहींना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. विलगीकरण व अलगीकरण वेळीच झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. त्यानंतर संशयितांची रक्त तपासणी केल्यामुळे पॉझिटीव्ह-निगेटिव्हचे रिपोर्ट आले.
डॉ. तिवसकर पुढे म्हणाले की, परदेशात काय झाले? त्या देशातील तज्ञांनी प्रथम रक्त तपासणीला प्राधान्य दिले. ते विलगीकरण व अलगीकरण करण्याच्या भानगडीत पडले नाहीत. त्यामुळेच त्यांचा घात झाला आणि ब्रिटन, इटली, न्यूयॉर्कमध्ये मृतांची संख्या वाढली. आज हिंदुस्थानवगळता जगभरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लाखाच्या घरात गेली आहे. चुकीच्या नियोजनामुळेच त्यांच्यावर अशी वेळ आली. त्यामानाने आपले नुकसान झालेले नाही. लोकांनी घराबाहेर पडायचे नाही ठरवले आणि नियम पाळले तर नक्कीच आपला देश याच्यातून सावरेल, असेही डॉ. मंगेश तिवसकर यांनी शेवटी सांगितले.






















































