लॉकडाऊन असतानाही बायको घराबाहेर पडली, पाठलाग करणाऱ्या नवऱ्याला कळाले धक्कादायक वास्तव

36318

लॉकडाऊन काळामध्ये अनेकांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची उत्तम संधी मिळाली आहे तर दुसरीकडे याच लॉकडाऊनमुळे अनेक जोडप्यांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली आहे. या वादांमुळे कौटुंबिक प्रकरणे हाताळणाऱ्या वकिलांना येणाऱ्या फोन कॉलची संख्या वाढली आहे. 10 वर्षांपासून एकत्र नांदणारी जोडपी आता न्यायालय सुरू होण्याची वाट पाहतायत. न्यायालये सुरू झाली की ती तातडीने घटस्फोटासाठी अर्ज करणार आहेत. ज्यांचा घटस्फोट झाला आहे त्यांनीही वकिलांना फोन करायला सुरुवात केली आहे. आम्हाला मार्गदर्शन करा अशी विनंती ते करीत आहेत.

घटस्फोट झालेल्या जोडप्यांमधील कमावत्या नवऱ्यांनी पोटगी देण्यास येणाऱ्या अडचणींचा त्यांच्या वकिलांना पाढा वाचून दाखवायला सुरुवात केली आहे. भरपगारी रजा, पगारात कपात, नोकरी जाणे, व्यवसाय बंद असणे अशा अनेक कारणांमुळे पत्नीला पोटगी देण्यात घटस्फोट घेणाऱ्या नवऱ्यांना अडचणी यायला लागल्या आहेत. यातल्या बहुतांश जणांनी पोटगीची रक्कम न्यायालयाकडून कमी करून द्या अशी विनंती वकिलांना केली आहे. लॉकडाऊन काळात वादामुळे हैराण झालेल्या नवरा-बायकोंचे वकिलांना किमान 10 ते 20 फोन दर आठवड्याला येत आहेत.

काही वकिलांनी मुंबई मिरर या वर्तमानपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की लॉकडाऊन काळात घटस्फोटाची विचारणा करणारी अनेक जोडपी ही सुखवस्तू घरातील आहेत. संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं वारंवार सांगण्यात येत आहे. असं असतानाही एक महिला घराबाहेर पडली होती. बायकोला इतक्या घाईघाईने घराबाहेर जाण्याची वेळ का आली हे नवऱ्याला कळत नव्हतं. त्याने तिचा पाठलाग करायला सुरुवात केली तेव्हा त्याला कळालं की तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी बाहेर पडली होती. नवरा घरी असल्यामुळे त्याला या गोष्टीचा उलगडा झाला. दुसऱ्या एका प्रकरणामध्ये परदेशात कामाला असणारा नवरा लॉकडाऊनमुळे घरातच थांबला आहे. त्याच्या बायकोला तो काही फोन करणाऱ्यांशी वेगळ्या पद्धतीने बोलत असून तो संशयास्पद वागत असल्याचं कळालं. यामुळे तिनेही वकिलांना फोन केला आहे.

वकिलांनी त्यांना फोन करून त्यांना शांत राहण्याचं आणि टोकाचं पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला. मात्र अनेकांचं म्हणणं आहे की आता परिस्थिती हाताबाहेर गेली असून त्यांना सहन होत नाहीये. एका फोन करणाऱ्याने वकिलांना सांगितले की लॉकडाऊनमुळे त्याच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून तो 1.25 कोटींच्या पोटगीऐवजी आता फक्त 75 लाख रुपयेच पोटगी देऊ शकतो. दिवस जातील तशी परिस्थिती सुधारेल असी वकिलांना आशा वाटते आहे. मात्र परिस्थिती अशीच राहिली तर न्यायालये सुरू झाल्यानंतर घटस्फोटांचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळू शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या