केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अटीशर्तींसह इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूमुळे फैलावणाऱ्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. हा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. या काळात पहिले अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गोष्टीच सुरू राहतील असे जाहीर करण्यात आले होते. मात्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या सूचनावलीनुसार इतर सगळी दुकाने सशर्त सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यामध्ये दारूविक्रीच्या दुकानांना मात्र सवलत देण्यात आलेली नाही, म्हणजेच ती यापुढेही पुढची सूचना येईपर्यंत बंदच राहतील.

या दुकानांसाठी पहिली आणि महत्वाची अट ही असेल की एकूण कर्मचारी संख्येच्या फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांनीच दुकानात काम करायचे आणि सगळ्यांना मास्क घालणे हे बंधनकारक असेल. दुकानांना ही सलवत देण्यात आली असली तरी मॉल्स आणि शॉपिंग सेंटरसाठी ही परवानगी देण्यात आलेली नाही. ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला नाही अशा कंटेन्टमेंट झोन, हॉटस्पॉट भागामध्ये ही सवलत लागू असणार नाही.

जवळपास एक महिन्यापूर्वी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवत असल्याची घोषणा करण्यात आली. हा लॉकडाऊन वाढवत असताना अत्यावश्यक सेवांमध्ये काही नव्या बाबींचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये शेतीच्या कामांचा प्रामुख्याने समावेश होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनमध्ये सवलत मिळणाऱ्या गोष्टींच्या यादीत आणखी काही बाबींचा समावेश केला आहे. यामध्ये निवासी भागातील दुकाने, ग्रामीण भागातील बाजार संकुलांना लॉकडाऊनमध्ये सवलत देण्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी दारूविक्रीची दुकाने, ग्रामीण आणि शहरी भागातील मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स सध्या सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

या सवलती राज्यात लागू करायच्या अथवा नाही हा त्या त्या राज्य सरकारांवर अवलंबून असेल. या सवलती आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार राज्य सरकार कधीही बंद करू शकते. या सूचनावलीमध्ये केंद्र सरकारने नगरपालिका क्षेत्रातील बाजार संकुलांचाही समावेश केला आहे. ज्या दुकानांना सवलत देण्याचं या सूचनावलीत म्हटलं आहे त्यामध्ये निवासी भागात असलेल्या जवळपासच्या दुकानांचा समावेश आहे. शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्याअंतर्गत नोंदणी असणाऱ्या दुकानांनाच ही सवलत असेल असंही सूचनावलीत म्हटलं आहे.

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे 3 राज्यातील 4 जिल्ह्यामध्ये तज्ज्ञांचे पथक पाठवण्यात येणार असल्याचे वृत्त एका हिंदी संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे. या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचाही समावेश असल्याचे या बातमीत म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्याव्यतिरिक्त तज्ज्ञांचे पथक हे अहमदाबाद, सूरत, तेलंगणा, चेन्नईमध्येही जाणार आहे. ताज्या आकडेवारीनुसार अहमदाबाद आणि सूरत कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झाल्याचे दिसायला लागले आहे.