लॉकडाऊनमुळे सिनेमागृहांना 4500 कोटींचा फटका! आयनॉक्सच्या अधिकाऱ्यांची माहिती

कधीही न थांबणारी मनोरंजनसृष्टी लॉकडाऊनमुळे तब्बल तीन महिने ठप्प झाली. चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगसोबत सिनेमागृहेदेखील बंद पडली. या काळात सिनेमागृहांचे तब्बल 4500 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती मल्टिप्लेक्स चेन आयनॉक्सच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लॉकडाऊनमुळे गुलाबो सिताबो, भूज, सडक 2, लक्ष्मी बॉम्ब, लूटकेस असे चित्रपट थेट डिजिटल रिलीज होत असल्याने थिएटरमालक नाराज आहेत. थिएटर पुन्हा कधी सुरू होतील या आशेवर थिएटर मालक असताना मंगळवारी अचानक दोन बडय़ा चित्रपटांच्या रिलीजची घोषणा करण्यात आली. रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट दिवाळीला तर कबीर खान दिग्दर्शित 83 हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार असल्याची घोषणा झाल्याने थिएटर मालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मल्टिप्लेक्स चेन प्रमोटर सिद्धार्थ जैन यांच्या म्हणण्यानुसार सिनेमांच्या तिकीटविक्रीतून सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सचे दरमहा 1 हजार कोटी रूपयांचे तर पार्किग आणि खाद्यपदार्थांच्या विक्रीतून पाचशे कोटी रूपयांचे कलेक्शन होते. अशाप्रकारे तीन महिन्यांत तब्बल 4500 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.

बहुतेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मकर रिलीज होणार असले तरी सूर्यवंशी, 83, मुंबई सागा, छलांग, लालसिंग चड्ढा, राधे हे आगामी सिनेमे सिनेमागृहांना गतवैभव मिळवून देतील, अशी आशा थिएटरमालकांना आहे.

आपली प्रतिक्रिया द्या