पश्चिम रेल्वेच्या 40 अतिरिक्त फेऱ्या, ‘परे’च्या एकूण फेऱ्यांची संख्या आता 202

300

अनलॉक 1.0 अंतर्गत मुंबईत अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी चालविण्यात येत असलेल्या उपनगरीय लोकलच्या फेऱ्यांमध्ये पश्चिम रेल्वेने सोमवार 29 जूनपासून 40 फेऱ्यांनी वाढ करीत एकूण 202 फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या विनंतीनुसार उपनगरीय लोकलमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अशा वाढविल्या 40 फेऱ्या

पश्चिम रेल्वेने सोमवारपासून 40 नव्या फेऱ्या वाढविल्या असून चर्चगेट ते बोरीवलीदरम्यान 20 सेवा वाढविल्या आहेत. (10 अप आणि 10 डाऊन), बोरीवली आणि विरार दरम्यान डाऊन दिशेला धिम्या मार्गावर 2 अतिरिक्त फेऱ्या, वसई ते चर्चगेट दरम्यान अप दिशेला 2 जलद फेऱ्या, बोरीवली ते विरार दरम्यान अप दिशेला दोन धिम्या फेऱ्या, तसेच चर्चगेट ते विरार दरम्यान 14 जलद सेवा (8 डाऊन दिशेला तर 6 अप दिशेला)अशा एकूण चाळीस फेऱ्या पश्चिम रेल्वेने वाढत्या गर्दीला सामाविण्यासाठी वाढविल्या असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

देशभरातील लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून बंद असलेली मुंबईची उपनगरीय लोकल सेवा 84 दिवसांनी सोमवार 15 जूनपासून राज्य सरकारच्या विनंतीनुसार अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने 200 तर पश्चिम रेल्वेने 162 सेवांद्वारे प्रारंभ केला होता. या सेवांमध्ये केवळ राज्य सरकारचे अत्यावश्यक कर्मचारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे.

शिवसेना स्थानीय लोकाधिकार महासंघाची मागणी

उपनगरीय लोकलमध्ये केंद्र सरकारच्या बँक आणि पोस्टल कर्मचाऱ्यांसह अन्य केंद्रींय कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येत नव्हता. त्यामुळे नाराजी व्यक्त झाली होती. यासंदर्भात शिवसेना स्थानीय लोकाधिकार महासंघ व टपाल कर्मचारी सेनेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी रेल्वे बोर्डाला पत्र लिहून बँक आणि इतर कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक लोकलमध्ये प्रकेश द्यावा अशी विनंती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या