निलंबनाचा इशारा मिळताच मीरा-भाईंदर पालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती थेट 25 टक्क्यांनी वाढली

521

पालिकेच्या जवळपास राहूनही कामावर येत नाही, असे अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करण्याची नोटीस काढा, असे आदेश आयुक्तांनी देताच, मीरा-भाईंदर पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या तंबूत घबराट निर्माण झाली आहे. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती थेट पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे.

लॉकडाउन घोषित होताच मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी घरीच बसणे पसंत केले. त्यामुळे पालिकेच्या दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होउ लागला. हॉस्पिटल, सफाई, पाणि या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य लोकांनी घरी बसणे पसंत केले. पालिकेत काम करणारे बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी हे मीरा-भाईंदर शहरात रहाणारे आहेत. आणि प्रत्येकाकडे किमान दुचाकी वाहन आहे. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी पालिकेच्या वाहनांची सोय आहे. असे असतानाही हे कर्मचारी कामावर येत नव्हते. त्यामुळेच अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी नोटीस बजावण्याचे आदेश पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी  सामान्य प्रशासन विभागाला दिले. याची माहिती मिळताच नोटीस मिळण्याआधीच पंचवीस टक्क्यांपेक्षां जास्त कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या