कोरोनाला रोखण्यासाठी दहिसर, बोरिवली, कांदिवलीत धारावी पॅटर्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर मुंबईत कोरोना रोखण्याठी पालिकेने यशस्वी झालेल्या धारावी पॅटर्नच्या धर्तीवर जोरदार काम सुरू केले असून घरोघरी स्क्रिनिंग, मोबाईल क्लिनिक, स्ट्रिक कंटेनमेंट आणि प्रभावीपणे क्वारंटाइन मोहीम राबवली जात आहे. ‘मिशन झिरो’ अंतर्गत दहिसर, बोरिवली, कांदिवलीत तीन दिवसांत 16 आरोग्य शिबिरे, 15 मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून 1 लाख 26 हजार 313 लोकसंख्येच्या परिसरात 1 हजार 95 जणांचे स्क्रिंनग केले असून यात संशयित आढळलेल्या 18 जणांपैकी 5 पाच जण पॉझिटिव्ह 4 जण निगेटिव्ह आढळले आहेत. तर 10 रिपोर्ट प्रलंबित आहेत.

पालिकेच्या झोन 7 मध्ये येणाऱया ‘आर दक्षिण’ म्हणजे कांदिवली, ‘आर मध्य’ म्हणजेच बोरिवली आणि ‘आर उत्तर’ म्हणजेच दहिसर विभागात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या ‘मिशन झिरो’ अंतर्गत काम सुरू असल्याची माहिती उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. यामध्ये एखाद्या इमारतीत कोरोनाबाधित आढळल्यास संपूर्ण इमारत सिल करून नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. कंटेनमेंट झोनमधील चारपैकी तीन रस्ते सील करून अत्यावश्यक सेवेची गैरसोय होऊ नये म्हणून फक्त एक रस्ता सुरू ठेवण्यात येत असल्याचेही शंकरवार यांनी सांगितले. कोरानाबाधित आढळल्यास परिसरातील सर्वांचे स्क्रिनिंग, लक्षणे आढळल्यास तातडीने कोरोना चाचणी करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. यामध्ये मोबाईल व्हॅनचा मोठा फायदा होत असून सध्या प्रतिदिन सुमारे अडीच ते तीन हजार जणांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळे उत्तर मुंबईतील कोरोना लवकरच आटोक्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या तिन्ही विभागात सध्या 2059 ऑक्टिव्ह केसेस असून 2089 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

असे होतेय काम

पालिकेच्या आर दक्षिण विभागात 13, आर मध्य – 3 आणि आर उत्तरमध्ये 7 कोरोना केअर सेंटर असून यात लक्षणे नसलेल्या कोरोना संशितांसाठी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. याठिकाणची बेड क्षमता 6179 असून सध्या 3919 बेड रिक्त आहेत.

तर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी असलेल्यांसाठी तीन वॉर्डमध्ये एकूण 10 कोरोना केअर सेंटर असून या ठिकाणी 1853 बेड आहेत. या ठिकाणीही 1543 बेड बॅलन्स
आहेत.

कोरोनाचा प्रभाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत या विभागात 7 लाख 25 हजार 973 घरांना भेटी देऊन तब्बल 18 लाख 90 हजार 723 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 2 लाख 84 हजार 273 जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले. यामध्ये 3179 संशयित आढळल्याने कारोना चाचणी आणि आवश्यक उपचार करण्यात आले.