Lockdown – सरकार खंबीर आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील जनता धैर्य, चिकाटी, जिद्दीने कोरोनाच्या संकटाला सामोरी जात आहे. मात्र कोरोनाच्या रुग्णांची वाढत जाणारी संख्या पाहता आता अधिक खंबीर पावले उचलण्याची वेळ आली आहे. जनता कर्फ्युला ज्याप्रमाणे उत्स्फुर्त प्रतिसाद दिला त्याप्रमाणेच पुढचे काही दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे राज्यातील संपूर्ण नागरी भागात नाईलाजाने 144 कलम लावण्यात येत आहे. राज्यभरातील सर्व सरकारी तसेच खासगी वाहतूक बंद करण्यात येत आहे. ज्या बस सुरू राहतील त्यातून केवळ अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांनाच ने-आण करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद राहतील. शासकीय कार्यालयांत केवळ पाच टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील़ हे संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, आवश्यक ती काळजी घेण्यासाठीच हे पाऊल उचलले आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी 3 वाजता फेसबुक लाइव्ह, यू ट्यूब तसेच टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी घाबरून न जाता निश्चय, संयमाने शासनाच्या बरोबरीने या संकटाचा मुकाबला करावा. पुढील परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार खंबीर असल्याची ग्वाही जनतेला दिली. यंत्रणेत काम करणारी ही माणसेच आहेत याची जाणीव करून देताना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेवरचा ताण न वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ही शांतता आणि संयम आपल्याला ३१ तारखेपर्यंत ठेवायची आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा
जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे. त्याची अजिबात कमतरता नाही. तसेच ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत. त्यामुळे त्याचा साठा करून ठेवू नका. अजिबात घाबरून जाऊ नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले. संकट गंभीर असले तरी सरकार खंबीर आहे. निश्चय, संयम, जिद्द आणि स्वयंशिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्की मात करू, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा मनापासून सहकार्य करण्याचे, शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे.

परीक्षेचा खरा काळ, रोगाचा गुणाकार होऊ देऊ नका!
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे आपण शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्या तरी सर्वांच्या परीक्षेचा कठीण काळ आता सुरू झाला आहे. सर्वांनी स्वयंशिस्तीने, सांगितलेले स्वच्छतेचे आणि इतर नियम पाळून वागण्याची नितांत गरज आहे. आतापर्यंत आपण सर्वांनी सहकार्य केले आहे, यापुढेही ते कायम राहू द्या, असेही ते म्हणाले. यातूनच या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, त्याचा फैलाव रोखणे शक्य आहे. या प्रादुर्भावाचा गुणाकार आपल्याला समाजात होऊ द्यायचा नाही, तर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून याची वजाबाकी करून त्याला हद्दपार करायचे आहे, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कर्फ्यु उठला म्हणून फिरायला लागू नका!
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सर्वप्रथम आपल्याला या संकटावर मात करायची आहे. आज जनता कफ्र्यू आहे म्हणून बाहेर पडायचे नाही आणि उद्या कसेही वागायला, फिरायला मोकळे असा त्याचा अर्थ होत नाही. आपण अतिशय संवेदनशील स्थितीमध्ये पोहोचलो आहोत. गेल्या दोन दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. ही संख्या कमी नाही, तर ती थांबवायची असेल तर आपल्याला गर्दीत जाणे टाळणे, गर्दी न करणे, घराच्या बाहेर आवश्यकता नसेल तर बाहेर न पडणे यांसारख्या गोष्टी करणे अत्यावश्यक आहे.

घरातल्या क्वारंटाईन व्यक्तींनी बाहेर फिरू नये
आजपर्यंत महाराष्ट्रात परदेशातून नागरिक, आपले कुटुंबीय आले आहेत. आता विमानसेवा बंद केल्याने परदेशातून आता कुणी आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे आपल्याला संकटावर मात करण्याची, प्रादुर्भावाची ही साखळी तोडण्याची चांगली संधी आहे. विलगीकरण कक्षात असलेल्या नातेवाईकांची काळजी करण्याची गरज नाही. त्यांची काळजी शासन आणि महापालिका घेत आहे; परंतु परदेशातून ज्या व्यक्तींना घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे त्यांनी घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबीयांपासूनही स्वत:ला दूर करण्याची गरज आहे. ज्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत त्यांनी बाहेर, समाजात विंâवा घरातल्या लोकांमध्ये मिसळून प्रादुर्भाव वाढवू नये. किमान १५ दिवस बाहेर जाऊ नये, आपल्या प्रिय व्यक्तींपासून ही दूर राहावे. ज्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांनी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना भेटावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

माणुसकी जपा, कर्मचाऱ्यांचे किमान वेतन बंद करू नका!
आपण मंदिरे, धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे बंद केली. कारण हा विषाणू कोणत्याही प्रकारे जातपात, धर्म पाहत नाही. कोणताही देश या संकटातून सुटला नाही. म्हणूनच आपण अनेक खासगी कार्यालये, आस्थापना यांना कामगार, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची संख्या कमी करायला सांगितली. वर्क फ्रॉम होम असे सांगितले, पण हाच कर्मचारी आणि कामगारवर्ग आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांना जपा, माणुसकी सोडू नका आणि त्यांचे किमान वेतन बंद करू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. जनता कफ्र्यू संपला म्हणून उद्या कसेही वागायला, फिरायला मोकळे असा त्याचा अर्थ होत नाही. आपण अतिशय संवेदनशील स्थितीमध्ये पोहोचलो आहोत. कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसते आहे. ही संख्या कमी नाही, तर थांबवायची असेल तर आपल्याला गर्दीत जाणे टाळा. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे, त्याची अजिबात कमतरता नाही. तसेच ही दुकाने किंवा या सेवा बंद राहणार नाहीत. विमानसेवा बंद केल्याने परदेशातून आता कुणी आपल्याकडे येणार नाही. त्यामुळे प्रादुर्भावाची ही साखळी तुटेल.