कोरोनामुळे आठवडी बाजार बंद, भाज्यांचे भाव गडगडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण देशभरात कोरोना पसरु नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येत असून महाराष्ट्रात ही कोरोनाला प्रतिबंद व्हावा म्हणून शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात गर्दी होऊ नये म्हणून गर्दी होणाऱ्या सर्वच घटकांवर बंदी आणण्यात आली आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग लवकर होतो म्हणून जिल्हा प्रशासनाने यात्रा, महोत्सवासह आठवडी बाजारावरही बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहे. आठवडी बाजारात भाजीपाल्यासह फळे व जिवनाश्यक वस्तु विक्रीसाठी येतात. असंख्य शेतकरी आपले उत्पादन ही बाजारात विक्रीसाठी घेवून येतात. मात्र आठवडी बाजारावरच बंदी असल्याने भाज्याचे भाव गडगडले आहे.

गुरुवारी अंबड शहरातील बाजार असतो. बाजार स्थळावर सकाळपासून पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी कोणत्याच व्यापाऱ्याला आणि शेतकऱ्यांना आपली दुकाने लावू दिली नाही. शेतकऱ्यानी प्रचंड प्रमाणावर भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी आणली होती. मात्र प्रशासनाने त्यांना दुकाने लावण्यास मज्जाव केला. तोडलेला भाजीपाला आणि फळे विकावीच लागणार असल्याने काही शेतकऱ्यानी भाजीपाला टेम्पो, पिकअप, हातगाडीवर ठेवून संपूर्ण शहरात गल्ली-बोळात जावून भाजीपाला, फळे विकण्याचा प्रयत्न केला. ग्राहक नसल्याने भाज्याचे भाव गडगडले आहेत.

कोरोनामुळे उद्योग प्रमाणेच शेतीवर ही परिणाम होत असून शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले आहे. भाजीपाला काढणी योग्य झाला की तो काढावाच लागतो. मग ग्राहक असो अथवा नसो विक्री झाला तर चांगले नाहीतर फेकून द्यावा लागतो. कोरोनामुळे आठवडी बाजार भरत नसल्याने कॉलनीसह गल्ली-बोळात जावून माल
विकावा लागत आहे.

कोरोना जिवावर उठला
कोरोना लोकांच्या प्रमाणे शेतकऱ्याच्याही जिवावर उठला असून माझ्याकडे विविध भाज्यासह 5 एकर टरबूज आणि दोन एकर खरबुज आहेत. सगळेच पिके काढणीला आली असून कोरोना लवकर नियंत्रीत झाला नाही तर आमच्या भाज्या, फळे यांना मार्केट मिळणार नाही, परिणामी आर्थिक फटका बसणार आहे, कोरोना शेतकऱ्याच्या जिवावर उठला, असे लालवाडी येथील शेतकरी सुभाष चव्हाण यांनी सांगितले.