पिंपरी-चिंचवडमधील 2 प्रभाग कोरोनामुक्त, 1 प्रभाग हा रेडझोनमधून बाहेर

पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभागापैकी ‘अ’ आणि ‘ब’ प्रभाग कोरोनामुक्त आहेत. पुण्यातील रहिवासी असलेला नागरिक ‘ब’ प्रभागात पॉझिटीव्ह आला होता. पण, पुण्यातील रहिवासी असल्याने त्याची शहरात नोंद केली नाही. तर, तळवडे, रुपीनगर परिसर येत असलेला ‘फ’ प्रभाग ‘हॉटस्पॉट’ आहे. प्रभागात सर्वाधिक 30 रुग्ण आहेत. भोसरी, दिघी, चऱ्होली, बोपखेल हा भाग येत असलेला ‘इ’ प्रभाग ‘रेडझोन’मधून बाहेर पडला असून प्रभागातील रुग्णांचा आकडा कमी होऊन 13 वर आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 8 ते 30 एप्रिल दरम्यान दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत होते. केवळ 22 दिवसात तब्बल 95 नवीन रुग्णांची भर पडली होती. रुग्ण संख्येची साखळी शुक्रवारी (दि.1) रोजी तुटली. शुक्रवारी दिवसभरात एकाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले नाहीत. तर, मागील चार दिवसात 10 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. महापालिकेच्या आठपैकी दोन प्रभाग कोरोनामुक्त झाले आहेत.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. आज प्रसिद्ध केलेल्या नकाशात संभाजीनगर, मोहननगर, आकुर्डी, प्राधिकरण परिसर येत असलेला ‘अ’ प्रभाग कोरोनामुक्त झाला आहे. तर, रावेत, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड परिसर येत असलेला ‘ब’ प्रभाग पहिल्यापासून कोरोनामुक्त आहे. दोन दिवसांपुर्वी पुण्यातील गंजपेठेतून एक नागरिक चिंचवड परिसरातील एका नातेवाईकाकडे आले होते. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. पण, ते पुण्यातील रहिवासी असल्याने त्यांची नोंद महापालिका प्रशासनाने केली नाही. त्यामुळे ‘ब’ प्रभाग कोरोनामुक्तच राहिला आहे. कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या ‘फ’ प्रभागात सर्वाधिक 30 रुग्ण आहेत. तर, ‘इ’ प्रभाग रेडझोनमधून बाहेर आला असून रुग्ण संख्या कमी झाली आहे. प्रभागात आता 13 सक्रिय रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या