हातावरील स्टॅम्पने लांबपल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांचा गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परदेशातून आलेल्या तसेच विमानतळावरून घरीच राहण्याचे आदेश असलेले प्रवाशी लांबपल्ल्याच्या ट्रेनमधून प्रवास करीत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रवाशांना सहप्रवाशांनी ओळखून गोंधळ घातल्याने रेल्वे स्टाफच्या मदतीने अशा संशयित प्रवाशांना विविध स्थानकांत उतरवले आहे. सौराष्ट्र एक्सप्रेसमधून सहा प्रवाशांना, कच्छ एक्सप्रेसमधून पाच प्रवाशांना तर राजधानी एक्सप्रेसमधून सहा जणांना विविध स्थानकांत उतरवण्यात आले आहे.

मुंबई सेंट्रलहून सौराष्ट्र एक्सप्रेसने वडोदरासाठी निघालेल्या सहा प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प पाहून त्यांना बोरिवलीला उतरवण्यात आले आहे. त्यांनी सिंगापूरचा प्रवास केला होता. ते कोरोना निगेटिव्ह आढळले होते तरीही विमानतळावर त्यांच्या हातावर 14 दिवस घरीच राहण्याचा स्टॅम्प मारण्यात आला होता. त्यांचा स्टॅम्प पाहून सहप्रवाशांनी गोंधळ घातल्याने या सहा जणांना अखेर बोरिवली स्थानकात उतरवण्यात आले. तेथे डॉक्टरांद्वारे त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच कच्छ एक्स्प्रेसमधून पाच प्रवाशांना उतरवण्यात आले, ते थायलंडहून परतले होते. त्यांना पालघरला उतरवून डॉक्टरांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच राजधानी एक्स्प्रेसमधून दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांना तर फ्रान्सवरून आलेल्या तीन प्रवाशांना टीसींनी प्रवाशांच्या सांगण्यावरून उतरवल्याची घटना घडली. मंगळवारी मांडवी एक्स्प्रेसमधून दोन जर्मन महिलांना दादर स्थानकात उतरवून अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात नेण्यात आले होते. तर बुधवारी गरीब रथ एक्स्प्रेसमधून हातावर स्टॅम्प असलेल्या चार तरुणांना पालघरमध्ये उतरवण्यात आले होते.

रेल्वेचे ज्येष्ठांचे आरक्षण तात्पुरते बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वरिष्ठ नागरिकांना जास्त होत असल्याने आता त्यांच्यामार्फत होणारा अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी रेल्वेने 20 मार्चपासून रुग्ण, विद्यार्थ्यांना तसेच अपंगांना मिळणाऱ्या आरक्षणाला वगळून इतर ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे रेल्वेचे आरक्षण पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.