गोव्याच्या पर्यटन व्यवसायाला 1 हजार कोटींचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूच्या फैलावाचा गोव्याला भयंकर फटका बसला आहे. राज्यातील पर्यटन व्यवसायाला तब्बल 1 हजार कोटींहून अधिक फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लादलेल्या कठोर निर्बंधांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी ट्रव्हल ऍण्ड टुरिझम असोसिएशनने (टीटीएजी) बैठक बोलावली होती. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलली गेली नाही, तर जवळपास 60 ते 75 हजार नोकऱयांवर गंडांतर येईल, अशी भितीही या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

राजधानी दिल्लीतील सर्व मॉल बंद

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील सर्व मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किराणा, औषधी व भाज्यांची दुकाने यातून वगळण्यात आली आहेत. त्याचबरोबर काही मेट्रो स्थानकेही बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. कंपन्यांमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांना घरून काम करण्याची परवानगी देण्यात यावी असे निर्देशी उद्योगांना देण्यात आले आहेत.

कोरोनातून वाचलेल्या रुग्णाचा हृदयविकाराने मृत्यू

कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेला इटलीचा 69 वर्षीय रुग्ण पूर्ण बरा झाला. शुक्रवारी पहाटे जयपुरच्या एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराने या पर्यटकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. इटलीचा हा पर्यटक हृदयविकार व अस्थमाचा रोगी होता. कोरोनावर उपचार करण्यात आल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.