दुसऱ्या लॉकडाऊनने पोटावरच मारले! जुलैमध्ये 50 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा फैलाक रोखण्यासाठी जुलैमध्ये करण्यात आलेल्या दुसऱया लॉकडाऊनने गोरगरीब, पगारी नोकरदारांच्या पोटावरच मारले आहे. या लॉकडाऊनमध्ये 50 लाख लोकांच्या नोकऱया गेल्याचा धक्कादायक अहवाल सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने दिला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1.9 कोटी रोजगार बुडाले असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने कोरोना काळातील अर्थव्यवस्थेवर अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार कोरोनामुळे एप्रिलमध्ये 1.8 कोटी लोक बेरोजगार झाले. मेमध्ये हा आकडा एक लाखावरच आला. मात्र त्यानंतर कोरोनाने नोकऱयांवर निर्दयपणाने कुऱहाड चालवली. परिणामी अर्थव्यवस्था आचके देऊ लागली. जूनमध्ये परिस्थिती काही प्रमाणात सुधारली आणि 39 लाख लोकांना परत रोजगार मिळाला.

जुलैमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या काळात जवळपास 50 लाख लोकांच्या नोकऱया गेल्याचे या अहवालात स्पष्ट म्हटले आहे. 31 जुलैपर्यंत देशातील 1.9 कोटी लोकांनी आपला रोजगार गमावला होता. पगारी नोकरदारांच्या नोकऱया सुरक्षित मानल्या जातात. पण याच वर्गाला कोरोनाचा जबर फटका बसला.