विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजल्या; गुलाबपुष्प, सॅनिटायझर देऊन स्वागत

कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने राज्यातील शाळा पुन्हा एकदा गजबजल्या. आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. नऊ महिन्यांनतर शाळेची पायरी चढलेल्या विद्यार्थ्यांचे अनेक ठिकाणी पुष्पगुच्छ आणि सॅनिटायझर देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षक आणि वर्गमित्रमैत्रिणींना भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर ओसंडून वाहत होता.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका वगळता राज्यातील ग्रामीण भागात बुधवारपासून पाचवी ते आठवीचे वर्गदेखील सुरू झाले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज शाळेची घंटा वाजली असून राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनासंदर्भातील सर्व काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मास्क लावूनच शाळेत प्रवेश देण्यात आला.

ठाणे ग्रामीण भागात 422 शाळा सुरू

ठाणे जिह्याच्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या 422 शाळा आज सुरू झाल्या आहेत. जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. ठाणे जिह्याच्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीच्या 1346 शाळा आहेत. आज यापैकी 345 प्राथमिक शाळा तर 77 माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यानी मास्क लावल्याची खात्री करण्यात आली. तसेच शाळेत सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतर राखून बसविण्यात येत आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या भेटीने विद्यार्थी भारावले

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पुणे जिह्यातील मुळशी तालुक्यातील म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळेस भेट दिली. विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी शिक्षणमंत्र्यांच्या अचानक भेटीने विद्यार्थीदेखील भारावले. तसेच पुणे महानगरपालिका हद्दीतील आपटे प्रशाळा व मार्डन शाळा या दोन खासगी व हुतात्मा शिरीष कुमार या मनपाच्या शाळेतील नववी, दहावीच्या शाळेला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंजवडीलाही त्यांनी भेट दिली.

यावेळी वर्षा गायकवाड यांनी जे विद्यार्थी आजारी आहेत किंवा घरातील व्यक्ती आजारी असल्यास पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहन केले.

आपली प्रतिक्रिया द्या