कोरोनामुळे पावणे आठ लाख टन साखर पडून; साखर कारखाने आर्थिक संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अडचणीत असलेल्या साखर उद्योगासमोर कोरोनामुळे आणखी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून साखरेला मागणी नाही. त्यामुळे कारखान्यांच्या गोदामात साखर पडून आहे. नगर जिल्ह्यातील साखर कारखान्याकंडून आजघडीला पावणे आठ लाख टन साखर पडून आहे.

कोरोनाचे संकट लवकर न संपल्यास कारखान्यांसमोर आणखी अडचणी उभ्या राहणार आहेत. देशात साखर उत्पादन जास्त झाले असल्यामुळे जास्त साखर बाजारात येऊ नये म्हणून केंद्र सरकारने कारखान्यांना देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा ठरवून दिला आहे. निर्यातीसाठीही असाच कोटा ठरवून दिला आहे. 2019-20 मध्ये 20 लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्टे केंद्र सरकारने राज्याला दिले होते. त्यात नगर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी साखर निर्यात केली; मात्र, काही साखर कारखान्यांची साखर निर्यातीची प्रक्रिया सुरू असताना कोरोनामुळे केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या. त्यात साखर निर्यात ठप्प झाली. देशांतर्गत बाजारातही कोरोनामुळे साखरेला मागणी नाही. देशांतर्गत बाजारात उद्योगासाठी 70 टक्के साखरेची मागणी असते, तर 30 टक्के साखर घरगुती वापरासाठी खरेदी होते. कोल्ड्रिंक्स आईस्क्रिमसाठी उन्हाळ्यात साखरेची मागणी असते; तसेच दरात वाढ होत असते. यंदा मात्र उद्योग वापरासाठी साखरेची मागणी नाही. घरगुती वापरासाठी मागणी असली तरी ती कमी आहे. त्यात दुसर्‍या राज्याबरोबरची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे दुसर्‍या राज्यात साखर पुरवठा थांबला आहे. साखर विक्रीसाठी टेंडर काढल्यानंतर व्यापारी टेंडर भरत नाहीत. त्यामुळे साखर कारखान्यांकडे साखर पडून आहे. साखरेचा दर क्विंटलमागे तीनशे रुपयांनी घसरून 3000 ते 3 हजार 100 रुपयांपर्यत आला आहे. उन्हाळ्यात मागणी असल्याने हा दर क्विंटलमागे 3 हजार 500 रुपये असतो. साखरेची विक्री होत नसल्याने बँकांचे देणे थकले आहे. कामगारांचे पगार रखडले आहेत. नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे 7 लाख 78 हजार टन साखर पडून आहे. गेल्या महिनाभरापासून साखरेचे टेंडर व्यापारी भरत नसल्याची माहिती कारखान्यांकडून मिळाली. हे संकट आणखी काही दिवस असेच राहिल्यास साखरसाठा विक्रीची समस्या कारखान्यांसमोर असणार आहे.