
संपूर्ण जग हे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कसरत करत आहे. सर्वे उद्योग, व्यवसाय नाईलाजास्तव बंद करावे लागले. सगळीकडे रस्त्यावरली चाकं थांबली तशी औद्योगिक नगरीतलेही चाके थांबली. हातावर पोट असणाऱ्यांचे मात्र आभाळ झाले नाही. त्यांच्यासाठी शिवभोजन योजना खूप लाभदायी ठरत आहे. राज्य शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून रोज शेकडो लोकं तृप्त होत आहेत. सातारा जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रामुळे अनेकांना ताजे व सकस अन्न उपलब्ध होत आहे.
23 मार्च पासून महाराष्ट्र लॉकडाऊन झाला. अत्यावश्यक सेवा सोडून सगळी दुकाने, बाजारपेठा बंद करण्यात आले. यामध्ये हॉटेल, विविध खाद्य पदार्थ विक्री करणारे गाडे यांचाही समावेश आहे. यामुळे गोरगरीब नागरिक उपाशी राहिल ही बाब लक्षात घेऊन शासनाने जिल्ह्यात शिवभोजन योजनेची व्यापकता वाढवली. आजच्या घडीला ही शिवभोजन योजना प्रत्येक तालुक्यात सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील 26 केंद्रावर अंदाजे 1709 गरीब व गरजू लोक भोजनाचा लाभ घेत आहेत. ही शिवभोजन थाळी प्रती माणशी 5 रुपये या नाममात्र दरात उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सातारा शहरात100, जिल्हा परिषद 100, बेंद्रे स्नॅक्स-125, तहसील कार्यालय, सातारा-125 या ठिकाणी शिवभोजन योजना सुरु आहे. या प्रत्येक भोजनालयाला 125 शिवभोजन थाळी मंजूर आहेत. वडूज-125, कोरेगाव-150, मेढा-100, दहिवडी-125, महाबळेश्वर-100, पाटण- 150, शिरवळ ता. खंडाळा-150, फलटण-150, वाई-100 , कराड-525 अशा एकूण जिल्ह्यातील 26 भोजनालयांना 1 हजार 150 शिवभोजन थाळी मंजूर असून 26 भोजनालयांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार सोशियल डिस्टन्स पाळून वाटप गरजुंना नाममात्र 5 रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.































































