
कोरोनामुळे पालिकेला उत्पन्नात मोठा फटका बसला असला तरी मुंबईकरांच्या सोयी-सुविधांसाठी राबवण्यात येणाऱया महत्त्वाच्या 23 प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी खर्चात कोणतीही तडजोड न करता हे प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबईकरांचा प्रवास वेगवान बनवणाऱया कोस्टल रोडसह पंपिंग स्टेशन, रुग्णालयांचा विस्तार, जलबोगदे, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी सुमारे सात हजारांचा वाढीव खर्च करण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आले आहे. या वर्षी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला आहे. नव्या योजना, उपक्रम आणि आरोग्य सक्षम आरोग्य यंत्रणेसह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत कोणतीही तडजोड केली नसल्यामुळे अर्थसंकल्प वाढला असल्याचे बोलले जात आहे.
असा होणार खर्च
पालिकेच्या 23 महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा खर्च चालू वर्षात 79 हजार 829 कोटी होता. तर आगामी आर्थिक वर्षात हा खर्च 86 हजार 787 वर पोहचला आहे. म्हणजेच प्रकल्पांचा खर्च 6 हजार 958 कोटींनी वाढला आहे.
…हे प्रकल्पही मार्गी लागणार
पालिकेने गेल्या वर्षी 23 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन सुरू केले होते. या वर्षी ही संख्या 28 पर्यंत वाढविण्यात आली असून यात शीव कोळीवाडा वसतिगृह – 212 कोटी 27 लाख, नायर रुग्णालयाची नवी इमारत 187 कोटी, महात्मा फुले मंडईचा पुनर्विकास टप्पा दोन – 304 कोटी 19 लाख, परळ शिरोडकर मंडईचा पुनर्विकास 93 कोटी 38 लाख असा असा खर्च करण्यात येणार आहे.































































