
चीनपाठोपाठ कोरोना व्हायरस जलदगतीने पसरत असून आतापर्यंत जगातील 24 देशांमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत. कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱया चीनमधील नागरिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 811 लोकांचे बळी गेले असून तब्बल 37 हजार 198 लोकांना या व्हायरसची लागण झाल्याची माहिती नॅशनल हेल्थ कमिशनने रविवारी दिली.
शनिवारी रात्री कोरोनाचा दिवसभरातील 89 वा बळी गेला आणखी 2 हजार 656 नागरिकांना या व्हायरसची एका दिवसात लागण झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी बळी गेलेल्या चिनी नागरिकांमध्ये 81 जण हुवेई, दोन जण हेनान आणि प्रत्येकी एक जण अन्य नऊ शहरांतील आहेत. दरम्यान शनिवारी उपचारानंतर बरे झालेल्या 600 जणांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे.
जिनफिंग यांना मोदींचे पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती जिनफिंग यांना पत्र लिहून कोरोना व्हायरसविरोधी लढाईत हिंदुस्थान चीनसोबत असल्याचे सांगितले. या लाढाईत चीनला हिंदुस्थान सर्वतोपरी मदत करेल. या जागतिक आपत्तीसमयी सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असेही पंतप्रधान मोदी यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच हिंदुस्थानातील 650 विद्यार्थ्यांनी वुहानमधून एअरलिफ्ट करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी जिनफिंग यांचे आभारही मानले.
केरळात सुमारे तीन हजार जण देखरेखीखाली
केरळमध्ये कोरोना व्हायरसला राज्य आपत्ती म्हणून जाहीर करण्यात आले होते. आता हा इशारा मागे घेण्यात आला आहे. केरळ सरकारने दिलेल्या माहितीनुसार सुमारे 3 हजार 114 लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. यातील तीन हजार 99 जणांवर घरीच तर 45 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 330 जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठविण्यात आले होते. यातील 288 जणांची चाचणी निगेटिव्ह आली असून उर्वरित रिपोर्ट येणे बाकी आहे. कोरोना व्हायरसबाबत अफवा पसरवणाऱया किंवा जादूटोण्याने बरा करण्याचा दावा केल्याबद्दल पोलिसांनी 9 गुन्हे दाखल केले आहेत.
लस तयार करण्यात जगभरातील शास्त्रज्ञ जुंपले
कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यात जगभरातील शास्त्रज्ञ जुंपले आहेत. असे म्हटले जात आहे की, ही लस तयार होण्यात सुमारे सहा महिन्यांचा काळ लागू शकतो. विविध देशांतील शास्त्र्ाज्ञ कोरोनाला प्रतिकार करणारी लस तयार करण्याच्या कामगिरीवर लागले आहेत. या संशोधनात लाखो डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान लस बनविण्यात सहा महिने लागणार असल्याने तोपर्यंत रोज सुमारे 100 लोक तरी या व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणार आहेत.

























































