कोरोनाच्या दहशतीमुळे तेजसच्या रेलसुंदरींना मास्क; अनारक्षित डब्यांची टोकन पद्धत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दहशतीने सर्वत्र थैमान घातले असताना आता रेल्वेनेही आपल्या अनारक्षित जनरल डब्यांमध्ये रांगेने प्रवेश देण्याकरिता सुरू केलेली बायोमेट्रीक टोकन पद्धत बंद केली आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱयांची बायोमेट्रीक हजेरीदेखील बंद करण्यात आली आहे. नुकत्याच सुरू केलेल्या पहिल्या प्रायव्हेट मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेच्या रेलसुंदरींनीही ‘मास्क’ परिधान केले आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने मुंबई ते अहमदाबाद धावणाऱया प्रायव्हेट ‘तेजस’ एक्स्प्रेसमधील रेलसंदरींनी मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. तसेच मध्य रेल्वेने अलिकडेच जनरल डब्यातील अनारक्षित जागांसाठी होणाऱया रेटारेटी आणि घुसखोरी टाळण्यासाठी अशा प्रवाशांना बायोमेट्रीक कुपण देण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या कुपनप्रमाणे लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये प्रवाशांना रांगेने प्रवेश देणे सोपे झाले होते. लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकात अशा प्रकारे बायोमेट्रीक टोकनने डब्यात प्रवेश देण्यात येत होता. आता कोरोना व्हायरसची सगळीकडे दहशत पसरत असल्याने, शिवाय हा विषाणू गर्दीच्या ठिकाणांवर पसरण्याची जादा शक्यता असल्याने रेल्वेने आपल्या पद्धतीने तातडीने आपल्या कर्मचाऱयांची बायोमेट्रीक हजेरी बंद केली आहे. त्याशिवाय अनारक्षित जनरल डब्यांमध्ये रांगेने प्रवेश देण्यासाठी अंगठय़ाचा ठसा घेऊन बायोमेट्रीक कुपनद्वारे प्रवेश दिले जात होते ते कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या बंद केले आहेत.

प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी पथनाट्य

कोरोना व्हायरससंदर्भातील जाहिराती व सूचना प्रवाशांना समजाव्यात यासाठी स्थानिक भाषेत यासंदर्भात भित्तीपत्रके, पथनाटय़ व इतर कार्यक्रम करण्याच्या सूचना सर्व झोनल रेल्वेला रेल्वे बोर्डाने दिले आहेत. अशा रुग्णांना वेगळे ठेवण्यासाठी खास वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. रेल्वेने आपल्या रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार ठेवले आहेत. कोरोना प्रतिबंधनासाठी त्या-त्या राज्य सरकारच्या वैद्यकीय रेल्वेच्या डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफला प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश सर्व झोनल रेल्वेना रेल्वे बोर्डाने दिले आहेत.