
कोरोना विषाणूमुळे या वर्षी जपानमध्ये होणारे टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आले. आता जगातील प्रतिष्ठsची क्रीडा स्पर्धा अर्थातच ऑलिम्पिक 2021 सालामध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बहुतांशी देशांना यश प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) जॉन कोटस् यांनी स्पष्ट मत व्यक्त करताना म्हटले की, 2021 सालामध्ये कोरोना असो किंवा नसो, टोकियो ऑलिम्पिक कुठल्याही परिस्थितीत होणारच. पुढे ते म्हणाले, जागतिक युद्ध वगळता ऑलिम्पिक एकदाही रद्द करण्यात आलेले नाही. भूकंप, सुनामीसारखी संकटे आली तरीही ऑलिम्पिक ठरल्या वेळेप्रमाणेच पार पडले. त्यामुळे कोरोनाचे संकट असले तरी पुढल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक आयोजित केले जाईल, असा विश्वासही पुढे त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
जपानी जनता विरोधात
ऑलिम्पिकचे आयोजन टोकियो येथे करण्यात यावे की नाही याबाबत जपानमध्ये सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये जपानमधील जनता टोकियो ऑलिम्पिकच्या विरोधात असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. टोकियो ऑलिम्पिक आणखी पुढे ढकलावे नाहीतर रद्द करावे असा सूर यावेळी उमटला.


























































