
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली जिल्ह्यात नॉनकरप्ट असे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या रुपाने लाभले आहेत. मात्र, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लाचेच्या रुपात वैयक्तीक फंड गोळा करण्यात सक्रिय झाले आहेत. अवैध धंदे बंद करणे हा फार्स ठरला असुन तेराही पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व अवैध धंदे जोरात सुरु आहेत. दिड महिन्याच्या काळात दोन कर्मचाऱ्यांना लाचखोरीच्या गुन्ह्यात अडकावे लागले. ही घटना नॉन करप्ट एसपींच्या काळामध्ये करप्शन सुरुच असल्याबाबत शिक्कामोर्तब करणारी आहे.
जुलै महिना संपायला दोन-तीन दिवसाचा अवधी असतांना थेट आयपीएस योगेश कुमार यांनी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक म्हणुन कार्यभार स्विकारला. नॉन करप्ट, प्रामाणिक, तरुण आणि पारदर्शी अधिकारी अशी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची ओळख आहे. मात्र, एसपी चांगले असले तरीही पोलीस दलाला भ्रष्टाचाराची लागलेली किड आणि पैसे खाऊ वृत्तीमुळे बरबटलेली यंत्रणा याचा प्रत्यय जिल्ह्याला आला आहे. नागरिकांची पैशासाठी होणारी पिळवणुक पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांना रोखता आली नाही. स्थानिक गुन्हे शाखा म्हणजेच एलसीबीचा लोकल कलेक्शन ब्रँन्च हा नवा अर्थ उदयाला आल्याचे बोलले जाते. जेथुन कलेक्शन मिळते तिथल्या अवैध धंद्यापर्यंत एलसीबीची धाड पोहचत नसल्याचे बोलले जाते.
यापुर्वीचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या काळात एलसीबी आणि मोक्याच्या पोस्टींगसाठी १५ हजार रुपयांचा दारुचा खंबा देण्यापासुन ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाख मोलाची रक्कम मोजल्याची चर्चा आहे. अधिकाऱ्यांना ५ ते १० लाख तर कर्मचाऱ्यांना ५० हजार ते १ लाखाचे टेंडर भरावे लागल्याचे खासगीत पोलीस कर्मचारी सांगतात. नॉन करप्ट पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या काळात या पुर्वी वरीष्ठाना टेंडरसाठी भरलेले पैसे काढण्यासाठी मोठ्या करामती होत आहेत. ११० ई ग च्या जामीनासाठी १५ ते २० हजार रुपये घेतले जात असल्याचे बोलले जात असुन एलसीबीचे कलेक्शन या माध्यमातुन जोरात सुरु आहे. तर कळमनुरीत पोलीस निरीक्षकाच्या शासकीय निवासस्थानाच्या परिसरातुन सागवानाची झाडे पोलीस निरीक्षकाने तोडुन फर्निचर बनविल्याची लेखी तक्रार एका नागरिकाने केली. दिड महिना उलटुनही नॉन करप्ट पोलीस अधीक्षकांच्या काळात या तक्रारीचा सोक्षमोक्ष लागला नाही. दरम्यान, तेराही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरु आहेत. मागिल दोन महिन्यात नव्या एसपींच्या काळात मटका-जुगार, अवैध वाहतुक, अवैध दारुविक्रीची कार्यवाही वाढल्याचे आकडे दाखविले जात आहेत. मात्र, हे वाढलेले आकडेच जिल्ह्यात अवैध धंदे फोपावल्याचे सांगतात. दर महिन्याला अवैध धंदे चालकांना दिखाव्यासाठी काही केसेस द्यावे लागत असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, हिंगोली शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला आणि गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनेरगाव नाका पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दिड महिन्यात दोन पोलीस अडकल्याची ही पहिली घटना आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना संबंधीत ठाणेदार व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना कार्यवाहीतील ५० टक्के वाटा द्यावा लागत असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांचा बळी जात असला तरीही भ्रष्ट अधिकारी मात्र नाम निराळे राहत आहेत. नॉन करप्ट पोलीस अधीक्षकासमोर करप्शन रोखण्याचे मोठे आव्हान उभे टाकले आहे.































































