भ्रष्टाचार लॉकडाऊन! दीड महिन्यात केवळ 12 ट्रॅप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. त्याचा फटका लाच मागणार्‍यांनाही बसला आहे. व्यवहार होत नसल्याने चिरीमिरी धंदे बंद झाले आहेत. म्हणूनच गेल्या दीड महिन्यात एरवी जोरात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. 45 दिवसात केवळ बारा ट्रॅपच्या घटना घडल्या.

इतरवेळी कोणतेही काम करून देण्यासाठी चिरीमिरी मागणारे जोरात असतात. त्यामुळे अँटी करप्शन ब्युरोकडून कुठे ना कुठे ट्रॅप लावले जातात. पण लॉकडाऊनमुळे भ्रष्टाचार देखील थंडावला आहे. एप्रिल महिन्यात लाच मागणाऱ्यांविरोधात केवळ सात ट्रॅप लागले. तर चालू महिन्यात 14 मे पर्यंत फक्त पाच ट्रॅप लागले. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात लाच मागितल्याप्रकरणी 58 गुन्ह्यांची नोंद झाली होती, त्यात 77 जणांचा समावेश होता. तर गेल्या मे महिन्यात 132 गुन्हे दाखल होते आणि त्यात 41 जणांचा समावेश होता. मार्च महिन्याच्या अखेरीस लॉकडाऊन सुरू झाला मात्र जानेवारीपासून तोपर्यंत राज्यात शेकडो ट्रॅप लागले होते.