पांढरे सोने फुलले; कमी भावामुळे शेतकऱ्यांवर संकट

परतीचा पाऊस लांबल्याने कापूस उत्पादक शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पाऊस ओसरल्यानंतर गेल्या सात–आठ दिवसांपासून पडणाऱया कडक उन्हामुळे शेतात ‘पांढरे सोने’ (कापूस) फुलू लागला असून, वेचणीसाठी शेतकऱयांनी लगबग सुरू केली आहे. दरम्यान, कापसाला बाजारात कमी भाव मिळत असल्याने आणि वेचणीसाठी प्रतिकिलो 12 ते 15 रुपये मजुरी दिली, तरी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

राहुरी तालुक्यातील बहुतेक शेतकऱयांनी यंदा कापूस पिकाला प्राधान्य दिले होते. मात्र, परतीच्या पावसाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत हजेरी लावल्याने अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले. मान्सून उशिरा सुरू झाल्याने पिके करपण्याची वेळ आली होती; पण नंतर झालेल्या पावसाने काहीशी आशा निर्माण झाली. तथापि, परतीच्या पावसाने पुन्हा निराशा केली. या पावसामुळे कापूस, सोयाबीन, मका, चारा, घास, कडवळ आदी पिकांचेही नुकसान झाले आहे.

कडक उन्हात पुन्हा फुलला कापूस

गेल्या आठ–दहा दिवसांपासून पडणाऱया कडक उन्हामुळे शेतातील कापसाची झाडे पुन्हा फुलू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी मिळेल, त्या भावात मजूर शोधून वेचणीसाठी धडपड करत आहेत. दिवाळी जवळ आल्याने कापूस विक्री करूनच सण साजरा करण्याची वेळ अनेक शेतकऱयांवर आली असून, त्यातून मजुरांसाठीची धावपळ सुरू आहे.

कमी दर, वाढलेला खर्च

सुरुवातीपासूनच कापसाला समाधानकारक भाव मिळत नाही. व्यापाऱयांनी सुरुवातीला ‘कापूस भिजलेला आहे’ या कारणावरून क्विंटलमागे 4,500 रुपये भाव दिला. नंतर भाव थोडा वाढला, असला तरी केवळ 6 हजार ते 6,500 रुपये क्विंटल इतकाच आहे. दुसरीकडे, वेचणीचा खर्च प्रचंड वाढला असून, प्रतिकिलो दर 5 ते 7 रुपयांवरून 12 ते 15 रुपयांपर्यंत गेला आहे. तरीदेखील मजूर मिळणे कठीण झाले आहे. कापसाचे पीक उभे करण्यासाठी शेतकऱयांनी बियाणे, रासायनिक खते, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला आहे. मात्र, सध्याच्या बाजारभावात तो खर्च निघणेही कठीण बनले आहे. त्यामुळे यावर्षी कापसाचे पीक शेतकऱयांसाठी तोटय़ात गेलेले दिसून येत आहे.