
भीषण दुष्काळाने होरपळलेल्या बीड जिल्ह्याला परतीच्या पावसाने असाही फटका दिला, जे पदरात पडले होते ते ही हिराऊन नेण्याचे काम निसर्गाने केले. आ’ दिवसाच्या धुवांधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अक्षरश: उद्धवस्त झाला. काढणी करून बाजरीच्या रचलेल्या बुचाडाला अक्षरश: कोंब फुटले, कोट्यावधीचा कापूस सडून गेला, तर तूर आणि ज्वारी काळी पडली. सोयाबीन नेस्तनाबूत झाली. शेतकरी परतीच्या पावसाने संकटात सापडला आहे.
बीड जिल्ह्याला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. दुष्काळाचे चटके सोसलेल्या बीड जिल्ह्यात या पावसामुळे कोरडे पडलेले धरणे, बंधारे, खचाखच भरले, ओढे, नाले वाहू लागले. मात्र दुसरीकडे दुष्काळाच्या होरपळीतही तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेल्या खरीप पिकावर नांगर फिरवण्याचे काम या परतीच्या पावसाने केले. वेचणीला आलेल कापूस पावसात सापडला, कापसाच्या बोंडे अक्षरश: सडून गेली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
काढणी झालेली बाजरीचे खळे करण्यासाठी शेतकऱ्यांनी बुचाड रचून ठेवले होते. झड लागलेल्या पावसामुळे बाजरीच्या बुचाडाला अक्षरश: कोंब फुटले आहेत. अशीच अवस्था सोयाबीनची झाली आहे. तूर आणि ज्वारी काळी पडली आहे. शेतकऱ्यांची वर्षभराची कमाई परतीच्या पावसाने हिरावून घेतली. झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.



























































