वेगवान माऱ्याचा जुना बादशहा! वाढत्या वयाला जेम्स अँडरसनने धुडकावून लावलं, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 56व्यांदा केली धडाकेबाज कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पुन्हा एकदा आपल्या वाढत्या वयाला धुडकावून लावत आपला अचूक मारा आणि लयबद्द गोलंदाजीचा जलवा सुरू ठेवला आहे. वेगवान गोलंदाजांचे करिअर फार काळ टिकत नाही, हा समज इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनने खोटा ठरवला आहे. वयाची 43 वर्षे पूर्ण केलेल्या अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला असला, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची विकेट्स घेण्याची भूक अजूनही कायम आहे.

County Championship 2026 मध्ये लँकेशायरचे नेतृत्व करताना त्याने नॉर्थम्प्टनशायरविरुद्धच्या पहिल्याच डावात पाच बळी घेत सर्वांना थक्क केले आहे. अँडरसनने या कामगिरीसह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 56 व्यांदा पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. यासह त्याने रिची बेनॉड, जॉन स्नो आणि टीम इंडियाच्या आर. अश्विन यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे, ज्यांच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 56 वेळा ‘फाईव्ह विकेट हॉल’ची नोंद आहे. लँकेशायर आणि नॉर्थहॅम्पटनशायर यांच्यातील या सामन्यात अँडरसनने आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांना खेळपट्टीवर टिकू दिले नाही. 30 जुलै रोजी तो 44 वर्षांचा होईल, पण त्याच्या गोलंदाजीची धार अजूनही तरुण गोलंदाजांना लाजवणारी आहे.

IPL 2026 चा नवा ‘स्पिड किंग’, 23 वर्षांच्या गोलंदाजाने नोंदवला हंगामातील सर्वात वेगवान चेंडू

या सामन्यात अँडरसनने अवघ्या 13 षटकांच्या गोलंदाजीत पाच महत्त्वाचे बळी टिपले. त्याच्या अचूक टप्प्यासमोर रिकार्डो वास्कोनसेलोस, केल्विन हॅरिसन, सैफ झैब, जेम्स सेल्स आणि लुई किम्बर यांसारखे फलंदाज बाद झाले. विशेष म्हणजे हे यश त्याने पहिल्या डावातच मिळवले असून, दुसऱ्या डावात त्याच्याकडे आपल्या विकेट्सची संख्या आणखी वाढवण्याची संधी आहे.