
सामना ऑनलाईन। मुरबाड
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात प्रेमी युगलाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुरबाडमधील इंदे गावातील बाळाराम वाघ (21) याचे गावातीलच एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेम संबंध होते. त्यातूनच ते दोघे 28 सप्टेंबर पासून बोपत्ता झाले होते. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी टोकावडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, या प्रकरणी बाळाराम व अल्पवयीन मुलगी रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास टोकावडे पोलिसठाण्यात हजर झाले. मात्र पोलिसठाण्यात जाण्या अगोदर दोघांनीही विष प्राशन केले होते. विष प्राशन केल्याचे पोलीसांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दोघांना टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना उल्हासनगर येथील रुग्णालयात नेले. दोघांवर उपचार सुरु आसताना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुलीचा मृत्यू झाला. तर, सोमवारी पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान बाळारामचा देखील मृत्यु झाला.






























































