
संभाजीनगर जिल्हय़ातील पैठणच्या जायकवाडी धरणाच्या ‘नाथसागर’ जलाशयात उडी घेऊन कीर्ती सचिन लवांडे (22) व पती सचिन विठ्ठलराव लवांडे या नवदांपत्याने जीवन संपवले. आत्महत्येच्या या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून मोठी खळबळ उडाली आहे.
जायकवाडी धरणाच्या ‘नाथसागर’ जलाशयात आतील बाजूस असलेल्या पाण्यात या पती-पत्नीने आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मृत पती-पत्नीचे मृतदेह पाण्यात सकाळी व दुपारी एकामागोमाग तरंगताना आढळले. याबाबत माहिती अशी की, सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान जायककाडी धरणाच्या आतील बाजूस एका अनोळखी मृतदेह पाण्यात तरंगत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढले व सरकारी दवाखान्यात दाखल केले.























































