रेल्वेची मोठी दुर्घटना टळली; सचखंड एक्सप्रेसची कपलिंग दोन वेळा तुटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

अमृतसर नांदेड सचखंड एक्सप्रेसची कपलिंग अचानक तुटल्याने इंजिन पुढे निघून गेले तर डबे पाठीमागेच राहिले. एक्सप्रेस दौलताबाद रेल्वे स्थानकाच्या पुढे गेल्यानंतर ही घटना घडली. सुदैवाने काही अंतरावर डबे थांबले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे रेल्वेची दोन वेळा कपलिंग तुटल्यामुळे जवळपास दीड ते दोन तास रेल्वे उशीराने धावत होती.

अमृतसरहून नांदेडकडे जाणार्‍या सचखंड एक्सप्रेसने (शनिवार दि. 2) रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दौलताबाद रेल्वे स्टेशन सोडले. त्यानंतर काही क्षणात रेल्वेची कपलिंग तुटली. कपलिंग तुटल्यामुळे इंजिन भरधाव वेगात पुढे निघून गेले. तर डबे हळूहळू वेग कमी झाल्यानंतर थांबले. रेल्वे चालकाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर पुन्हा इंजिन पाठीमागे आणून रेल्वेला जोडण्यात आले. विशेष म्हणजे इंजिन जोडून रेल्वे निघाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा शरणपूर जवळ कपलिंग तुटली. पुन्हा रेल्वे इंजिन पुढे निघून गेले व डब्बे पाठीमागे राहिले. कपलिंग जोडण्याचे काम सुरू करण्यात आले, त्यानंतर साडेबारा वाजता रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली.