विक्रोळी, घाटकोपर, डोंबिवली, कल्याण 50 वर्षांपासूनचे स्पीड ब्रेकर्स हटवून मध्य रेल्वे वेगात धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
railway-tracks-mumbai-local

सामना प्रतिनिधी । मुंबई

विक्रोळी, घाटकोपर, डोंबिवली, कल्याण या ठिकाणी गेल्या 50 वर्षांपासून असलेले स्पीड ब्रेकर हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेगातील अडथळे दूर होणार आहेत.

ओव्हरहेड वायर आणि ट्रकमधील तांत्रिक बाबींमुळे पाच ठिवाणी लोकल  गाड्यांच्या वेगांवर कायमस्वरूपी निर्बंध लावण्यात आले आहेत. विक्रोळी, घाटकोपर, डोंबिवली आणि कल्याण अशा ठिवाणी हे वेग निर्बंध आहेत. यातील काही निर्बंध तर गेल्या पन्नास वर्षांपासून लागलेले आहेत. या ठिवाणी गाड्यांचा वेग ताशी 30 किमी इतका कमी असल्याने गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. अशा ठिकाणचे निर्बंध हटविण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे परवानगी मागण्यात येणार आहे.

पिकअवरमध्ये हॉलिडे स्पेशल चालवू नका

उपनगरातील लोकलच्या, विशेषतः मध्य रेल्वेच्या लोकलच्या वेळापत्रकाचा गेला महिनाभर पुरता बोर्‍या वाजल्याने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेऊन पिकअवरमध्ये लांबपल्ल्याच्या हॉलिडे स्पेशल गाड्या चालवू नका अशी तंबी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी मध्य रेल्वेची क्षमता पूर्ण वापरली जात असून अतिरिक्त हॉलिडे स्पेशल गाड्यांमुळे उपनगरीय लोकलच्या वक्तशीरपणावर परिणाम होत असल्याचे या बैठकीत रेल्वेमंत्र्यांना सांगितले. यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मग हॉलिडे स्पेशल गाड्या पिकअवरमध्ये का चालविता असा रेल्वे अधिकार्‍यांना जाब विचारला असल्याचे सांगण्यात येते. रेल्वेमंत्र्यांनी लोकल गाड्या वेळेवर धावण्यासाठी शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म उपाय योजा असे अधिकार्‍याना बजावले. मध्य रेल्वेवर जवळपास दर दिवसाला एक तांत्रिक बिघाड याप्रमाणे ट्रक आणि सिग्नल फेल्युअर किंवा इंजिन वा लोकल बिघाड होत आहेत. मध्य रेल्वेने पंक्चुऍलिटीत सुधारणा करण्यासाठी प्लॅन आखला असून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणार्‍या लांबपल्ल्याच्या गाड्यांना टिळक टर्मिनस ते ठाणे अशा तयार असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरून बाहेर काढले जाताना सध्या दर ताशी 80 कि.मी.च्या वेगाने चालविले जात होते. त्यांचा वेग आता दर ताशी 105 कि.मी. करण्यात येणार आहे.

सर्व प्रवासी संघटना एकत्र

महिनाभर मध्य रेल्वेवर कल्याणच्या पलीकडील प्रवाशांचे सततच्या रेल्वे गोंधळामुळे प्रचंड हाल होत आहेत. यासंदर्भात प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याने सर्व प्रवासी संघटना एकत्र येऊन त्यांनी 1 जुलै रोजी काळ्या फिती लावून प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात बुधवारी प्रवासी संघटनांच्या 60 प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आपल्या समोरील अडचणींचा पाढा वाचला. त्यामुळे अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांची मुंबईत एक बैठक घेतली होती.