देशभरात क्रेडिट कार्ड क्लोनिंगचा झोल करणारा मास्टरमाइंड सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

व्यापाऱ्यांना हाताशी धरून डेबिट/प्रेडिट कार्डचे पद्धतशीर क्लोनिंग करून परदेशी नागरिकांना लाखो रुपयांचा चुना लावणाऱया देशभरातील भामटय़ांचा मास्टरमाइंड मनोजकुमार राजशेखरन ऊर्फ अक्षय कुमार अखेर सापडला. क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने त्याच्या टोळीविरोधात कारवाई केल्यानंतर तो मलेशियाला पळाला. पण मुंबईत परतताच पोलिसांनी त्याला अटक केली.

डेबिट/प्रेडिट कार्डचे क्लोनिंग करून परदेशी नागरिकांचे पैसे लाटणाऱया सात जणांच्या टोळीला प्रॉपर्टी सेलने पकडले होते. मात्र, याचा मास्टरमाइंड मनोजकुमार मलेशियाला जाऊन लपला होता. तो मुंबईत येणार असल्याची खबर मिळताच प्रॉपर्टी सेलचे प्रमुख सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय लक्ष्मीकांत सांळुखे, सुनील माने, नागेश पुराणिक, उपनिरीक्षक अमित भोसले, अंमलदार अमित वळेकर, महेश मोहिते, किरण जगताप, सुनील कांगणे, शरद मुपुंदे, किरण जगदाळे या पथकाने सापळा रचून मुंबई विमानतळावर त्याला अटक केली.

परदेशी नागरिक टार्गेट
बीबीईचे शिक्षण घेणारा मनोज कार्ड क्लोनिंगमध्ये माहीर आहे. पूर्वी वेश्या व्यवसाय करणाऱ्या मनोजला मग एक श्रीलंकन हॅकर भेटला. त्यांच्या मदतीने मग त्याने कार्ड क्लोनिंग करण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने कुरियर बॉय, व्यावसायिक यांना हाताशी घेतले. त्याला नऊ वेळा अटक झाली होती. पण शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा तेच काम करतो. कार्ड क्लोनिंग करून परदेशी नागरिकांना लुटण्याचे टार्गेट ठेवले होते. उंची राहणीमान ठेवण्यासाठी झटपट पैसा कमाविण्यासाठी मनोज घरबसल्या ही कामे करतो.