अनुष्का शर्माला चहा देण्याचे निवड समितीचे काम

353

हिंदुस्थानचे माजी यष्टिरक्षक फारुख इंजिनीयर यांनी गुरुवारी हिंदुस्थानच्या निवड समितीवर कडाडून टीका केली. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये तर निवड समिती सदस्य विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिला चहा देताना पाहिले, असे स्पष्ट अन् परखड मत फारुख इंजिनीयर यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

हिंदुस्थानकडे ‘मिकी माऊस’ निवड समिती आहे. निवड समितीतील सदस्यांनी मिळून 12 कसोटी सामनेही खेळले नसतील. वर्ल्ड कपमध्ये एक व्यक्ती हिंदुस्थानी ब्लेझर घालून फिरत होता. मी एकाला त्याबाबत विचारले तेव्हा समजले की तो निवड समिती सदस्य आहे. तो त्यावेळी अनुष्का शर्माला चहा देत होता, असे फारुख इंजिनीयर यांनी पुढे सांगितले.

चहा नाही कॉफी पिते – अनुष्का शर्मा

फारुख इंजिनीयर यांनी आरोप केल्यानंतर अनुष्का शर्मा हिने सोशल साईटवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ती अशी, मी चहा नाही कॉफी पिते. वर्ल्ड कपमध्ये मी फक्त एका सामन्यासाठी स्टेडियममध्ये गेली होती. त्या लढतीत मी फॅमिली बॉक्समध्ये बसले होते. निवड समिती व त्यांच्या पात्रतेबाबत आक्षेप असेल तर त्यावर निश्चितच बोलावे. पण अशा विषयात माझे नाव ओढू नये, असे ती पुढे म्हणाली.

अनुष्का माझ्या मुलीसमान

अनुष्का शर्मा आणि निवड समिती सदस्यांवर टीका केल्यानंतर वादळ उठले. त्यानंतर फारुख इंजिनीयर यांनी घूमजाव केले. ते म्हणाले, अनुष्का माझ्या मुलीसमान असून माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला.

अनुभवाची कमी

हिंदुस्थानी सीनियर क्रिकेट संघासाठीच्या निवड समितीत ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. एम. एस. के. प्रसाद यांनी सहा कसोटी व 17 वन डे सामने खेळले आहेत. देवांग गांधी यांनी चार कसोटी व तीन वन डे, शरणदीप सिंग यांनी तीन कसोटी व पाच वन डे, जतीन परांजपे यांनी चार वन डे आणि गगन खोडा यांनी दोन वन डे सामने खेळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या