
हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) 89 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, 24 डिसेंबरला अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. आगामी ‘आयपीएल’मध्ये दोन नव्या संघांच्या समावेशाबद्दल या बैठकीत चर्चा होणार असून ‘आयसीसी’मध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधी म्हणून जय शहा यांची निवड होण्याची शक्यता आहे.
संलग्न संघटनांना दिले 23 मुद्दे
‘बीसीसीआय’ने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर सर्व संलग्न राज्य संघटनांना 21 दिवसांपूर्वीच 23 मुद्दे पाठविले आहेत. बैठकीत ‘बीसीसीआय’च्या नव्या उपाध्यपदाचाही निर्णय होणार आहे.
आयपीएल संघांसाठी दोन फ्रेंजाईजी उत्सुक
2021 च्या ‘आयपीएल’साठी कमी कालावधी उरल्याने या टी-20 स्पर्धेत आठच संघ खेळणार आहेत. मात्र 2022 च्या आयपीएलमध्ये नवे दोन संघ सहभागी करून घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘बीसीसीआय’च्या उद्या होणाऱया बैठकीत या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे. नव्या संघांमध्ये अहमदाबाद फ्रेंचाईजीसाठी अदाणी ग्रुप व गोयंका ग्रुप यांच्यात रस्सीखेच असल्याची चर्चा आहे. दुसऱया संघासाठी पुणे, कानपूर व लखनौ या नावांची चर्चा सुरू आहे. 2021 च्या आयपीएलसाठी छोटा लिलाव घेण्याचा ‘बीसीसीआय’चा विचार आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होईल.
विविध क्रिकेट समित्यांची निवड
या बैठकीत विविध क्रिकेट समित्या तयार केल्या जातील. सल्लागार समितीची स्थापना करून ही समिती इंग्लंडच्या दौऱयापूर्वी फेब्रुवारीमध्ये 3 नव्या संघनिवड समिती सदस्यांची निवड करेल. ‘बीसीसीआय’ची तांत्रिक समिती आणि आगामी वर्षी हिंदुस्थानात होणाऱया टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीबद्दलही या बैठकीत चर्चा होणार आहे. याचबरोबर 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित होणार आहे.
गांगुली-शहा येणार आमने-सामने
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठकीपूर्वी अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांच्या संघात एक मैत्रीपूर्ण सामना रंगणार आहे. यात बीसीसीआयचे इतर अधिकारीही सहभागी होणार आहेत. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या मोटेरा मैदानावर हा सामना खेळवला जाईल. टेनिस बॉलवर हा सामना होणार आहे. आगामी वर्षी इंग्लंडचा संघ हिंदुस्थान दौऱयावर येणार आहे.


























































