हिंदुस्थानी फलंदाजांचं तंत्र उघडं पडलं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

हिंदुस्थानी संघाच्या पराभवाला विशेषण काय वापरावं? नामुष्की की लाजिरवाणा? ज्या पद्धतीने हिंदुस्थानी संघ दुसऱया डावात कोसळला ते पाहिलं की ‘लाजिरवाणा’ शब्दसुद्धा लाजला असता. हिंदुस्थानी संघाचा इतिहासातला हा नीचांक. खरं तर आजची सकाळ मस्त जाईल असं वाटलं होतं. दुसऱया दिवसअखेर 62 धावांची आघाडी होती. हिंदुस्थानी संघाचा वरचष्मा आहे असं वाटतं होतं. पहिल्या डावातल्या विराट कोहली, पुजारा आणि रहाणे यांच्या फलंदाजीमुळे आशा निर्माण झाली होती. त्यामुळे ठरवलं की, योगासनं करता करता मॅच बघावी आणि मग मस्तपैकी ब्रेकफास्ट घ्यावा. पण हेझलवूड आणि कमिन्स या दोघांनी जबरदस्त असे नॉकआऊट पंचेस दिले की, डोळय़ांवरच्या ‘वर’चष्म्याच्या दोन्ही काचा फोडून टाकल्या. हे ठोसे इतके जबरदस्त होते की, ‘वर’चष्मा तर फुटलाच, पण डोळय़ांवर चढलेला मोठेपणाचा पडदाही फाटून छिन्हविच्छिन्ह झाला. हेझलवूड, कमिन्सच्या 9 षटकांत आपले फलंदाजीचे तथाकथित राजपुत्र कोसळले. त्या त्यांच्या स्पेलमध्ये प्रत्येक चेंडूवर विकेट लिहिलेली असं वाटायला लागलं. फलंदाजांची लागलेली ‘घासलेट’ची लाइन मला व्यथित करत होती (की पूर्वी ज्यावेळेला घासलेट मिळायचं नाही त्यावेळेला घासलेटसाठी दुकानावर लाइन लागायची. आणि त्या काळात जेव्हा जेव्हा हिंदुस्थानी संघ कोसळायचा त्यावेळेला ‘घासलेटची लाइन लागली’ असं म्हटलं जायचं).

हे नेमकं का घडलं आणि कसं घडलं? मुळात दोन्ही डावांत हिंदुस्थानची सुरुवात निराशाजनक होती. पृथ्वी शॉ दोन्ही डावांत जवळपास तसाच बाद झाला. त्याची बॅट येताना स्लिपवरून येते आणि ती बॅट आणि पॅडमधील गॅप बंदच होत नाही. बऱयाचदा ती इतकी मोठी असते की, त्यातून हत्ती जाऊ शकतो. दोन्ही डावांत नेमक्या त्याच्या याच वैगुण्यावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बोटं ठेवलं. पहिल्या डावात मिचेल स्टार्क व दुसऱया डावात कमिन्सनं त्याला बाद केलं. ही गॅप जर लवकर बंद झाली नाही तर त्याची कारकीर्द धोक्यात येऊ शकते. एक गोष्ट आपल्याला मान्य करायला पाहिजे की, दुसऱया डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. त्यांचा टप्पा हा त्यांनी यावेळेला जास्त खोलवर ठेवला. चेंडूला जास्त स्विंग व्हायची मुभा दिली. आणि बऱयाचदा दिशा अशी होती की, फलंदाज नसता तर चेंडू ऑफ बेल घेऊन गेला असता. बऱयाच मोठय़ा वेगवान गोलंदाजांचं म्हणणं असं आहे की, अशाप्रकारची दिशा आणि टप्पा ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. अर्थात काही वेळेला बाऊन्सर टाकताना, यॉर्कर टाकताना किंवा फलंदाजाला ड्राइव्हवर फसवण्यासाठी चेंडूच्या दिशेमध्ये बदल करावा लागतो. जसा त्याने विराट कोहलीला बाद करताना केला. टप्पा पुढे ठेवला की विराट कोहली पाय पुढे ठेवून कव्हर ड्राइव्ह मारायला जातो ही गोष्ट आता जगजाहीर आहे. त्या पद्धतीने त्याला कव्हर्समधून अनंत धावासुद्धा मिळालेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीने सहा वर्षांपूर्वी त्याला बादही केलेले आहे. पहिल्या डावात त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दाखवलेल्या गाजराकडे दुर्लक्ष केलं. पण दुसऱया डावात त्याची बॅट चेंडूच्या फार लवकर प्रेमात पडली आणि गलीमध्ये ग्रीनने उत्कृष्ट झेल घेतला. त्यामुळे विराट कोहलीच्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांच्या टॅक्टीसबद्दल क्रेडिट दिलं गेलं तरी विराट कोहलीकडेसुद्धा स्वतःला बाद करण्याचं क्रेडिट जातं.

इतर फलंदाजांचं कायं झालं? त्यांना निःसंशयपणे चेंडू चांगले पडले. विशेषतः पुजाराला पडलेल्या चेंडूची दिशा ही आत येणारी होती. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने तो खेळायला गेला, पण तो चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन गेला. काही वेळेला स्विंग होणारा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त बाऊन्सही झाला. पण गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी टाकावी ही अपेक्षाच असते त्यांच्याकडून. फलंदाजांचं मोठेपण अशा गोलंदाजीवर विकेट न देणं आणि धावा करणं याच्यावर असतं. प्रतिपक्षाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली हे पराभवाचं कारण देता येत नाही; कारण फलंदाजांकडे दर्जेदार गोलंदाजीला देण्यासाठी उत्तर हवं की नको? नाहीतर त्यांना दर्जेदार का म्हणायचं? हिंदुस्थानी फलंदाजांचं तंत्र उघडं पडलं. हिंदुस्थानी फलंदाजांचं फुटवर्कच फारसं नव्हतं. ना पुढे ना मागे. अलीकडेच सुनील गावसकरने फलंदाजांना एक सल्ला दिला होता की, ऑस्ट्रेलियामध्ये वेगवान गोलंदाजी खेळताना तुमच्या पायाची मुव्हमेण्ट ही बॅक आणि ऍक्रॉस हवी. त्यामुळे बाऊन्स होणारा चेंडू खेळण्याच्या तुम्ही तयारीमध्ये येता. सर्व महान फलंदाजांची वेगवान गोलंदाजी खेळतानाची मुव्हमेण्ट ही बॅक आणि ऍक्रॉस असते. सर डॉन ब्रॅडमन आणि सर गॅरी सोबर्स यांचे असं म्हणणं आहे की, ज्या फलंदाजांकडे बॅकफुटवर बचाव आणि फटके नाहीत ते महान फलंदाजच नव्हेत. असाच एखादा सचिन तेंडुलकर पुढे झुकतो किंवा विव रिचर्डस डावा पाय पुढे टाकतो. पण या दोन्ही फलंदाजांकडे एक विलक्षण देणगी होती. मागच्या पायावर रेलून बॅलन्स साधायचा, डोकं स्थिर ठेवायचं आणि बॅकफूटवर फटके खेळायचे. म्हणून तर सचिन काय किंवा विव रिचर्डस् हे ऑस्ट्रेलियात यशस्वी झाले. ते बाऊन्सवर स्वार होऊ शकत. आणि स्वार होऊन फटके मारत. आजच्या पिढीच्या फलंदाजांची एक समस्या आहे. ही मंडळी बरेच टी-20 आणि वन डे क्रिकेट खेळतात. या दोन्हींमध्ये पांढऱया चेंडूचा वापर होतो. पांढरा चेंडू हा लाल किंवा गुलाबी चेंडू एवढा स्विंग होत नाही. दुसरं म्हणजे, फटके खेळण्यासाठी फलंदाज फ्रंटफूटवर यायला उत्सुक असतो. बऱयाचदा आपल्याला टी-20 व वन डेमध्ये पुल किंवा स्क्वेअर कट फ्रंटफूटवर मारलेली दिसते. त्याचसोबत पांढरा चेंडू स्विंग होत नसल्यामुळे स्विंगचा सराव या वातावरणात वाढलेल्या फलंदाजांना नसतो. यावेळी आयपीएलमध्ये असं दिसलं की पहिल्या दोन, चार ओव्हरमध्ये चेंडू ज्या वेळेला स्विंग व्हायचा, त्यावेळी बोल्टसारख्या नैसर्गिक स्विंग गोलंदाजाला पॉवरप्लेमध्ये विकेट मिळून जायच्या. टी-20ची सवय कसोटीत पटकन बदलता येणं कठीण असतं. या सवयी म्हणजे दिवा नव्हे बटण दाबलं की पेटला, बटण बंद केलं की विझला. त्यामुळे याबाबतीत हिंदुस्थानी फलंदाजांना उरलेल्या कसोटीत नक्कीच विचार करावा लागेल. एक गोष्ट आहे की, लाल चेंडू हा गुलाबी चेंडूएवढा स्विंग होणार नाही. पण संघामध्ये जे प्रशिक्षक आहेत त्यांनी हिंदुस्थानी फलंदाजांच्या तंत्रावर पुन्हा मेहनत घ्यायला हवी.

मला आणखी दोन मुद्दे मांडावेसे वाटतात, एक म्हणजे बुमराहला नाईट वॉचमन म्हणून पाठवण्याचा निर्णय कुणाचा? आधीच्या कुठल्या तरी वार्मअप मॅचमध्ये 50 केले म्हणून तो निर्णय घेतला का? त्या शेवटच्या सत्रामध्ये त्याला चेंडू लागला असता तर? जसा शमीला शेवटी लागला. कारण ज्यावेळेला कमी षटके टाकायची असतात त्यावेळेला वेगवान गोलंदाज पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी टाकतो. अश्विनसारख्या माणसाला पाठवलं असतं तर मी समजू शकतो. कारण अश्विनच्या नावावर कसोटी शतकंसुद्धा आहेत. पण बुमराह? अरे, तो तुमचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याला फुलासारखं जपलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ऑस्ट्रेलियन फलंदाजीच्या मानसिकतेत दुसऱया डावात किती फरक पडला ते बघा. ते कोशात जाणं वगैरे त्यांनी टाळलं आणि त्यांचा आक्रमक नैसर्गिक खेळ केला. अर्थात त्यांना ठाऊक होतं की, आपल्याला 90च धावा करायच्या आहेत. प्रतिस्पर्ध्यांचा एक वेगवान गोलंदाज जायबंदी झालेला आहे. आणि हिंदुस्थानी गोलंदाजी दबावाखाली आहे. आपण ऑस्ट्रेलियन फलंदाजीत जान भरण्याचं काम तेवढं केलं. आता शून्यातून आपल्याला उभं राहायचं आहे. तेसुद्धा विराट कोहलीशिवाय. रहाणेच्या डोक्यावर आता मोठी जबाबदारी आहे. पण त्याने एक गोष्ट लक्षात ठेवावी, हिंदुस्थानी फलंदाजीचा पाचोळा झाला असला तरी झाड पुन्हा कधीतरी हिरवं होतंच. मागचं विसरून त्या हिरवेपणाकडे लक्ष द्यावे.