
कोरोनाच्या संकटामुळे मागील मोसमात रणजी, दुलीप यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धा हिंदुस्थानात खेळवण्यात आल्या नाहीत. यामुळे देशातील क्रिकेटपटूंपासून बीसीसीआयला तोटा सहन करावा लागलाय. मात्र आतापर्यंत कोटय़वधींची कमाई करणाऱया बीसीसीआयकडून खेळाडूंना नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. पण हिंदुस्थानातील देशातंर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱया स्थानिक (प्रथमश्रेणी) क्रिकेटपटूंना मागील मोसमाची नुकसानभरपाई बीसीसीआयकडून अद्याप देण्यात आलेली नाही. बीसीसीआयने यावेळी राज्य संघटनांवर ही जबाबदारी ढकलली आहे. आता मागील मोसमातील मानधन क्रिकेटपटूंना मिळेल का, मिळाल्यास त्यामध्ये कपात केलेली असेल का, असे प्रश्न यावेळी निर्माण झाले आहेत.
विचार सुरू, पण…
कोरोनाच्या काळातील नुकसानभरपाई खेळाडूंना दिली जाईल असे बीसीसीआयकडून आश्वासन देण्यात आले होते. पण आता बीसीसीआयकडून सांगण्यात येत आहे की, आम्ही याबाबत विचार करीत आहोत. पण ही भरपाई देण्यासाठी वचनबद्ध नाही आहोत. बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱयाने या प्रकरणाबाबत बोलताना स्पष्ट केले की, स्थानिक स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱया क्रिकेटपटूंना नुकसानभरपाई देण्याबाबत विचार सुरू आहे. पण त्याआधी संलग्न राज्य संघटनांसोबत चर्चा करावी लागणार आहे. राज्य संघटनांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
मोसम पूर्ण झाला असता तर अंतिम संघात कोण?
कोरोनामुळे मागील मोसमात बहुतांशी स्पर्धांना कात्री लावण्यात आली. विजय हजारे व सय्यद मुश्ताक अली या दोन स्पर्धा खेळवण्यात आल्या. त्यामुळे नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य संघटनांसमोर मोठे आव्हान असणार आहे. कोरोना नसता आणि संपूर्ण मोसम पार पडला असता तर कोणकोणत्या खेळाडूंना अंतिम संघात संधी देण्यात आली असती याबाबतची यादी राज्य संघटनांना तयार करावी लागणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणाऱया पुढील मोसमातील खेळाडूंची यादीही राज्य संघटनांना तयार करावी लागणार आहे.























































