
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाचा धमाका 19 सप्टेंबरपासून यूएईत पाहायला मिळणार आहे. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा नसली तरी हिंदुस्थानातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठी स्पर्धा म्हणून त्याकडे बघितले जाते. तसेच यामध्ये देश तसेच विदेशातील खेळाडू सहभागी होतात. त्यामुळे क्रिकेटपटूंची डोपिंग टेस्ट या स्पर्धेदरम्यान केली जाणार आहे.
आयपीएलमध्ये सहभागी होणाऱया क्रिकेटपटूंच्या युरिन नमुन्यांची चाचणी स्पेनमधील बार्सिलोना येथील प्रयोगशाळेत होणार असल्याची माहिती राष्ट्रीय ऍण्टी डोपिंग एजन्सीकडून (नाडा) यावेळी देण्यात आली.
बीसीसीआयचे बजेट वाढले
बार्सिलोनातील प्रयोगशाळेत खेळाडूंच्या युरिन नमुन्यांची चाचणी होणार असल्याने बीसीसीआयलादेखील आपले बजेट वाढवावे लागले आहे. या प्रयोगशाळेशी करार केल्यानंतर आता कतारपेक्षा दहापट जास्त रक्कम बीसीसीआयला मोजावी लागणार आहे. त्यामुळे कमीत कमी चाचण्या करण्याचा निर्णय यावेळी बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. स्पर्धेदरम्यान 20 व स्पर्धेबाहेर 30 अशा चाचण्या यावेळी करण्यात येणार आहेत.

























































