रणजीऐवजी विजय हजारे ट्रॉफीला पसंती, बीसीसीआयच्या बैठकीतील सूर

कोरोनाच्या संकटामुळे यंदा क्रिकेटचा बहुतांश हंगाम वाया गेला. त्यामुळे रणजी करंडक स्पर्धा घ्यावी की विजय हजारे करंडक स्पर्धेचे आयोजन करावे असा पेच निर्माण झाला आहे. मात्र हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) रविवारी झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत याबाबत योग्य तोडगा निघू शकला नाही. पण रणजी ट्रॉफीतील लढती चार दिवसांच्या असतात, त्यामुळे खेळाडूंना प्रदीर्घ काळ बायोबबल ठेवण्यात मोठय़ा अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या बैठकीत रणजीऐवजी विजय हजारे ट्रॉफीच्या आयोजनाला पसंती देण्यात आली आहे. मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. आगामी दिवसांत बीसीसीआयकडून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

कोरोनामुळे तब्बल 10 महिन्यांनंतर स्थानिक क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. 10 जानेवारीपासून सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. ही स्पर्धा सहा जैव-सुरक्षित केंद्रांवर 31 जानेवारीपर्यंत चालणार आहे. ‘आयपीएल’चा 14वा हंगाम मार्च ते मेमध्ये आयोजित करण्याचा ‘बीसीसीआय’चा मानस आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठीही जागा ठेवावी लागणार आहे. यामुळे रणजी करंडक किंवा विजय हजारे करंडक यापैकी कुठल्या एका स्पर्धेचे आयोजन करावे याबाबत एकमत होऊ शकले नाही. ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष सौरव गांगुली रणजी स्पर्धेसाठी आग्रही होते, तर इतर सदस्यांनी विजय हजारे करंडकाचा आग्रह धरला होता. त्यामुळे तूर्तास हा निर्णय लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र येत्या आठवडय़ाच्या अखेरीस याबाबत निर्णय होणार आल्याची माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली.

महिलांसाठी देशांतर्गत क्रिकेट हंगामासह श्रीलंका आणि इंग्लंडचे महिला संघ हिंदुस्थान दौऱयावर येणार आहेत. याचप्रमाणे विश्वचषक स्पर्धेसाठीच्या करसवलतीच्या मुद्दय़ावर ‘बीसीसीआय’ केंद्र सरकारकडे आपली बाजू मांडणार असल्याचे बैठकीत ठरले.

आपली प्रतिक्रिया द्या