
तडाखेबंद बॅटिंग, फसवी गोलंदाजी आणि चित्त्याच्या चपळाईने केलेले क्षेत्ररक्षण अशा अष्टपैलू खेळाने लाखो क्रिकेटशौकिनांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या युवराज सिंगने मी पुन्हा येतोय, माझ्या कारकीर्दीची दुसरी इनिंग लवकरच सुरू होईल असे सांगून आपल्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढवले आहेत. युवराजने आपल्या घरात चेंडू घेऊन फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यात त्याची सावली फलंदाजी करताना दिसतेय. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर युवराजने इंग्लंडविरुद्ध 2007 च्या टी-20 विश्वचषकामध्ये एकाच षटकात ठोकलेल्या विक्रमी षटकारांचे वर्णन करणारे समालोचन ऐकायला मिळते. माझ्या कारकीर्दीतील दुसऱया डावाचा आरंभ जवळ आलाय, असेही त्याने व्हिडीओतील टेक्स्ट संदेशाद्वारे चाहत्यांना कळवले आहे.























































