परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने बेरोजगारांची फसवणूक; गुन्हे शाखेची कारवाई

परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देऊ अशी बतावणी करीत परदेशातील नोकरीचे स्वप्न बघणाऱया बेरोजगारांची आर्थिक फसवणूक करणाऱया अंधेरी येथील एका बोगस एम्प्लॉयमेंट कार्यालयाचा गोरखधंदा गुन्हे शाखेने उधळून लावला. पोलिसांनी एकाला अटक करून रोकड व अन्य साहित्य हस्तगत केले आहे.

अंधेरी पूर्वेकडील द सुमित बिझनेज बे येथील 925 क्रमांकाच्या कार्यालयात बोगस एम्प्लॉयमेंट कार्यालय थाटण्यात आले होते. या प्रकरणी एका बेरोजगार तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तो पुढील तपासासाठी गुन्हे शाखा युनिट-8 कडे वर्ग करण्यात आला. मग युनिट-8 च्या पथकाने बोगस कारभार करणाऱया क्रिष्णा त्रिपाठी (52) याला अटक करून त्या बोगस कार्यालयावर छापा टाकला. त्या ठिकाणी एक लाख 22 हजार किमतीची रोकड, 45 सीमकार्ड, आठ लॅपटॉप, डेस्कटॉप, दोन मोबाईल, दोन बनावट स्टॅम्प, कागदपत्रे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.