
माहेरचे घर विकल्यावर आलेले पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचे एटीएम कार्ड अदलाबदली करून बँक खात्यातून पैसे काढणाऱ्याला धारावी पोलिसांनी अटक केली. साहिल सलीम शेख असे त्याचे नाव आहे.
धारावी येथे एक महिला राहते. त्यांचे जोगेश्वरी येथे माहेर आहे. माहेरचे घर विकल्यानंतर 50 हजार रुपये त्यांना त्यांच्या भावाने बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. फेब्रुवारी महिन्यात त्यांना त्यांच्या मुलीच्या शाळेची फी भरायची होती. त्यामुळे पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये त्या गेल्या. एटीएममध्ये कार्ड टाकून त्यांनी पिन नंबर दाबला. त्यांचे पैसे निघत नव्हते. तेव्हा एक जण तेथे आला. त्याने महिलेला पुन्हा कार्ड मशीनमध्ये टाकण्यास सांगितले. तरी देखील पैसे निघत नव्हते. मशीन खराब आहे, दुसऱ्या एटीएममधून पैसे काढा, असे त्याने महिलेला सांगितले. त्यावर विश्वास ठेवून महिलेने कार्ड पर्समध्ये ठेवले. काही वेळाने त्यांच्या खात्यातून 44 हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी कार्डची तपासणी केली, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीचे ते कार्ड असल्याचे लक्षात आले.
कर्ज घेणारा अटकेत
कर्जासाठी घेतलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून तिच्या नावाने कर्ज काढून फसवणूक करणाऱ्याला अखेर मालवणी पोलिसांनी अटक केली. आवेदश अहमद कुरेशी असे त्याचे नाव आहे.
तक्रारदार महिला मालवणी परिसरात राहते. त्या परिसरात राहणाऱ्या एका महिलेकडे तक्रारदार याने पैशाची गरज असल्याचे सांगितले होते तेव्हा त्या महिलेने तक्रारदार यांना ऑनलाइन कर्ज मिळवून देऊ असे सांगितले. त्यादरम्यान तिने त्याची तिघांशी ओळख करून दिली होती. त्याने महिलेला ऑनलाइन कर्ज मिळवून देतो अशा भुलथापा मारल्या. कर्जाच्या नावाखाली प्रोसेस फी आणि इतर कामाचे पैसे असे सांगून तिच्याकडून कागदपत्रे घेतली होती. त्या कागदपत्रांच्या आधारे महिलेला 5 लाखांचे कर्ज मंजूर झाले. मंजूर झालेल्या कर्जाची रक्कम खात्यात वर्ग होईल अशा त्याने भूलथापा मारल्या. कर्जाची रक्कम महिलेच्या खात्यात वर्ग झाली नव्हती. त्याने त्या रकमेचा परस्पर अपहार केला.