धक्कादायक; कोट्यवधींचा केमिकल लोचा, पुण्यात ‘एमडी’ ड्रग्जची फॅक्टरी

644

एटीएसच्या जुहू युनिटने पुण्याच्या दिवे गावात बुधवारी मोठी कारवाई केली. तिथे असल्फा केमिकल्सच्या नावाआड सुरू असलेला ड्रग्ज बनविण्याचा कारखाना पोलीस निरीक्षक दया नायक आणि त्यांच्या पथकाने उद्ध्वस्त केला. त्या कारखान्यात चार कोटी दोन लाखांचे एमडी आणि 1 कोटी 25 लाख किमतीचे कच्चे केमिकल व अन्य साहित्य मिळाले. त्या कच्च्या केमिकलपासून तब्बल 80 कोटींचे ड्रग्ज तयार करण्यात येणार होते असे सांगण्यात आले.

जुहू युनिटचे प्रभारी निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने गेल्या डिसेंबर महिन्यात महेंद्र पाटील (49) आणि संतोष आडके (29) या दोघा ड्रग्जमाफियांना पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विलेपार्ले व पुण्याच्या सासवड येथील जाधववाडीतून जवळपास 5 कोटी 60 लाख 60 हजार किमतीचा तब्बल 14 किलो 300 ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा जप्त केला होता. इतक्या मोठय़ा प्रमाणात एमडीचा साठा मिळाल्यामुळे दया नायक व पथकाने एटीएस प्रमुख देवेन भारती, उपायुक्त डॉ. विक्रम देशमाने व एसीपी श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास केला असता संतोष आडके याने पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील दिवे गावात असल्फा केमिकल्स नावाने कंपनी थाटली असून त्या कंपनीत प्रत्यक्षात एमडी बनविला जात असल्याचे समोर आले. त्यानुसार जुहू युनिटने बुधवारी त्या कारखान्यावर धडक मारली. त्यावेळी तेथे चार कोटी दोन लाख किमतीचा 10 किलो 500 ग्रॅम वजनाचा एमडीचा साठा आणि एक कोटी 25 लाख किमतीचे कच्चे केमिकल व अन्य साहित्य सापडले.

मग स्वतःचा कारखाना सुरू केला

गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात एटीएसने सरदार पाटीलसह अन्य ड्रग्जमाफियांना पकडून मोठय़ा प्रमाणात एमडीचा साठा हस्तगत केला होता. त्यानंतर संतोष आडके याच्यावर कारवाई झाली होती. आधी संतोष हा सरदार पाटीलसाठी काम करीत होता, पण केमिकल लोच्या करून एमडी बनविण्याचा फॉर्म्युला शिकल्यानंतर संतोषने स्वतःचा कारखाना सुरू केला होता, पण दया नायक व पथकाने तो फार काळ चालू दिला नाही.

ड्रग्जमाफियांना मोठा धक्का

एक कोटी 25 लाख किमतीच्या कच्च्या केमिकलपासून सुमारे 200 किलो एमडी बनविण्यात येणार होता. म्हणजेच जवळपास 80 कोटींचा एमडी साठा बनण्याआधीच पकडला गेल्याने मुंबईसह आजूबाजूच्या जिह्यातील व शहरातील ड्रग्जमाफियांना मोठा धक्का बसला आहे. दिव्यातल्या कारखान्यात एमडी बनविण्याचा फॉर्म्युला सापडला असून यात आणखी अटकेची कारवाई होणार असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या