कोल्हापूर तुरुंगातून फरार झालेल्या गुन्हेगाराला रत्नागिरीत पकडले

अभिजीत पाटणकर खून प्रकरणात शिक्षा भोगणारा मोईन मोहम्मद युसुफ काझी हा कोल्हापूर कारागृहातून फरार झाला होता. त्याला आज रत्नागिरी शहर पोलिसांनी कुवारबांव येथे पकडले. गेले अडीच महिने तो फरार होता.

2015 साली रत्नागिरीत अभिजीत पाटणकर या तरूणाचा खून झाला होता. या खुनातील गुन्हेगार मोईन मोहम्मद युसुफ काझी हा कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत होता. सुरुवातीला 30 दिवसांच्या संचित रजेवर तो कारागृहातून बाहेर पडला. त्यानंतर कोरोनाची 45 दिवसांची रजा त्याने घेतली. रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर झाला नाही. त्यानंतर कोल्हापूर कारागृहाच्या सूचनेनुसार रत्नागिरी विशेष कारागृहाने 11 जुलै 2022 रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मोईन मोहम्मद युसुफ काझी फरार असल्याची फिर्याद दाखल केली.

रत्नागिरी पोलीस मोईन मोहम्मद युसुफ काझी याचा शोध घेत होते. आज तो रत्नागिरीत आल्याची खबर पोलिसांना मिळाली त्यांनी कुवारबांव येथे त्याला पकडले. हि कारवाई पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण बर्गे, गणेश सावंत, आशिष भालेकर, अमोल भोसले आणि पंकज पडेलकर यांनी केली.