
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे असा एकूण 31 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. अथर्व राजेंद्र नांगरे ( वय 23, रा. शाहू चौक, आंग्रे वाडा, शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एककडून समर्थ आणि खडक पोलीस ठाण्यात गस्त घालण्यात येत होती. त्यावेळी पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुक्रवार पेठत सराईत पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा 31 हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटक्के, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखालील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, शाहिद शेख, निलेश शिवतरे, धनंजय ताजणे, मॅगी जाधव, गणेश ढगे, सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळप यांनी केली आहे.


























































