नगर तालुक्यात पावसामुळे सोयाबीनला मोड, कांदे सडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली नसली, तरी सतत पडणार्‍या पावसाने खरीप हंगामात पेरलेले सोयाबीन शेतातून काढता आले नाहीत. त्यांना मोड आले आहेत. जे काढून ठेवले त्यांनाही मोड आले. सततच्या पावसाने कांदा सडून गेला, बाजरीच्या कणसात अंकूर फुटले. तालुक्यात हजारो हेक्टरवरील कांदा, सोयाबीन, बाजरी, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नगर तालुक्यात 19 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीन, कापूस, कांदे, बाजरी व मका या पिकांची पेरणी करण्यात आली होती. पावसाळ्याच्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पण अखेरच्या हस्त नक्षत्रात पावसाची झड लागून राहिली, ती आजतागायत कायम आहे. नगर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली नसली, तरी सतत होत असलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन अनेक शेतकर्‍यांना काढता आलेले नाही. त्या सोयाबीनला शेतातच मोड फुटले आहेत. ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन काढले, त्यांना सततच्या पावसाने मळणी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांनाही ठेवलेल्या जागेवरच मोड फुटले आहेत.

नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यात आली होती. हा कांदा जागेवरच सडला आहे. बाजरीच्या कणसातच अंकूर फुटले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. खडकी, बाबुर्डी बेंद, सारोळे कासार, देऊळगाव सिद्धी, हिवरे झरे, खंडाळा या गावांमध्येही पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस अजूनही थांबलेला नाही. येत्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शेतातील पिकांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.