
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नव्याने पीककर्जाचा अर्ज करणाऱया शेतकऱयांना बँक, सरकारी कार्यालयांमध्ये जाण्याची गरज नाही. त्यांच्यासाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केली असल्यामुळे शेतकऱयांचा वेळ वाचणार आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्ज वाटपासंदर्भात आयोजित साप्ताहिक बैठकीत ते बोलत होते. पीककर्जाचे अर्ज सादर करण्यासाठी आता https://kcc.setuonline.com या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ही सुविधा सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयीकृत बँका तसेच सर्व खासगी व व्यापारी बॅंकांसाठी उपलब्ध आहे. ज्या शेतकऱयांनी यापूर्वी पीककर्ज घेतले असेल वा ज्यांच्याकडे किसान क्रेडीट कार्ड आहे, त्यावर कर्जसुविधा उपलब्ध असेल त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, शिखर बँकेचे व्यवस्थापक अर्धंदू शेखर व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
930 कोटींचे पीक कर्ज
जिह्यात 930 कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, दुग्ध व्यवसाय करणाऱया शेतकऱयांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळवून द्यावा, पीककर्ज योजना सर्व शेतकऱयांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना बँक प्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत.



























































