
हिंदुस्थान आणि पाकिस्तान आणि आता बांगलादेश यांच्यातील तणावाचा परिणाम या उपखंडातील क्रिकेट कॅलेंडरवर पाहायला मिळेल. क्रिकेटचे वेळापत्रक बदलू शकते. ऑगस्टमध्ये हिंदुस्थानचा क्रिकेट संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांसाठी बांगलादेशचा दौरा करणार आहे, परंतु अलिकडच्या घडामोडींमुळे हा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.
‘हा दौरा कॅलेंडरचा भाग आहे परंतु अद्याप काहीही अंतिम नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे हिंदुस्थान एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांसाठी बांगलादेशचा दौरा करणार नाही अशी शक्यता आहे’, असे एका सूत्राने सांगितल्याचे टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.
एका निवृत्त बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्याने नुकतीच बेताल बडबड केली. हिंदुस्थानच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवण्याच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरील एका निवेदनात, मेजर जनरल (निवृत्त) एएलएम फजलुर रहमान यांनी चीनसोबत संयुक्त लष्करी कारवाई करण्याची मागणीही केली होती.
‘जर हिंदुस्थानने पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशने ईशान्य हिंदुस्थानतील सात राज्ये ताब्यात घ्यावीत. या संदर्भात, मला वाटते की चीनसोबत संयुक्त लष्करी व्यवस्थेवर चर्चा सुरू करणे आवश्यक आहे’, असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
सध्याच्या परिस्थितीत, हिंदुस्थानकडून या दौऱ्यावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे केवळ बांगलादेश दौराच नाही, तर 2025 च्या आशिया कप स्पर्धेवरही अनिश्चितता आहे. हिंदुस्थान सरकारने अत्यंत कठोर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामुळेच भविष्यात शेजारी देशांसोबत क्रिकेट खेळणे जवळपास अशक्य आहे.
तिसऱ्या देशात तटस्थपणे खेळवला जाणारा आशिया कप सप्टेंबरमध्ये बांगलादेश मालिकेनंतर होणार आहे. अद्याप कोणतेही ठिकाण निश्चित झालेले नाही परंतु जाणकारांना वाटते की सध्या हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट स्पर्धेची जराही शक्यता नाही.